Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट | पुढारी

Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट

ओझर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी शिवाजीरोडवरील नगरपरिषद मुख्यालया समोर असलेल्या एका दुकानात असलेल्या महिलेची पोत हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला.  संगीता उगले यांचे स्टेशनरीचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्या दुकानात असताना एक अनोळखी व्यक्ती पेन घेण्याच्या बहाण्याने आला. पेन घेतल्यावर साई मंदिर कुठे आहे ? म्हणून त्याने विचारले असता उगले यांनी माहीत नसल्याचे सांगितले.

दरम्यान सुट्टे पैसे देत असताना त्यात चिल्लर समाविष्ट होती. त्यातून एक रुपयाचा डॉलर काऊंटरच्या आतील बाजूस संशयिताने मुद्दाम पाडला. उगले या तो डॉलर देण्यास खाली वाकल्या बरोबर त्या व्यक्तीने काहीतरी वस्तूच्या आधारे काही कळण्याच्या आत गळ्यातील पोत कापली. एक रुपयाचा डॉलर त्यास देत असताना उगले यांना त्यांची पोत संशयिताच्या हातात दिसली. यावेळी संगीता उगले या प्रचंड घाबरल्या. त्या पुतण्या अक्षय यास जोरजोरात हाक मारत घरात बघण्यासाठी गेल्या. त्याआधीच संशयिताने तेथून पोबारा केला होता.

पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी करत आसपासचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी शिवाजी चौकापासून रस्त्यांची तपासणी करत सदरचा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालकदास बैरागी करत आहे.

पोलिसांना आव्हान…

एरवी उपनगरात होणाऱ्या लुटमार विषयी आधीच चिंता व्यक्त केली जात असताना ओझर शहराच्या सर्वांधिक वर्दळीच्या ठिकाणी घडलेला प्रकार पोलिसांना आव्हान देऊन गेला आहे. या घडलेल्या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले असताना पोलीस नेमकी काय उपाययोजना करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सुरक्षित ठिकाण समजल्या जाणाऱ्या याच वर्दळीच्या वस्तीत घडलेल्या गंभीर प्रकारामुळे चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा : 

Back to top button