‘हा’ मसाला आहे सर्वात महागडा! | पुढारी

‘हा’ मसाला आहे सर्वात महागडा!

नवी दिल्ली : जेवणात मसाले नसतील तर आपल्याला ते स्वादिष्ट वाटत नाही. भारतात अनेक प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते; पण जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हा मसाला आहे केशर. त्याला ‘रेड गोल्ड’ असे म्हटले जाते याचे कारण हा पदार्थ सोन्याच्या दराने विकला जातो. जगात आढळणार्‍या मसाल्यांमध्ये सर्वात जास्त किंमत या ’रेड गोल्ड’ची आहे. जर तुम्ही केशर एक किलोग्रॅमसाठी घेतले, तर त्याची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे.

या मसाल्याच्या उच्च किमतीचे एक विशेष कारण म्हणजे ‘केशर’ वनस्पतीची शेती अतिशय कमी होत असते. एका फुलातून फक्त तीन केशराच्या काड्या सापडतात. केशर हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच हा जगातील सर्वात महागडा मसाला आहे. केशरचा वापर आयुर्वेदिक पाककृतींमध्ये, खाद्यपदार्थांमध्ये आणि देवांच्या पूजेपासून ते खाऊच्या पानाच्या सुगंधी विड्यापर्यंत अनेक ठिकाणी करतात.

केशर हे रक्त शुद्ध करणारे, कमी रक्तदाबासाठी उपाय आणि खोकला शमन करणारे देखील मानले जाते. या कारणामुळे, औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर केला जातो. भारतात काश्मीरमध्ये केशराचे उत्पादन होते. जगातील केशर उत्पादनापैकी 45 टक्के उत्पादन हे इराणमध्ये होते. केशराच्या वनस्पतीचा उगमही इराणमध्येच मानला जातो.

Back to top button