नाशिकमध्ये राज्यातील पहिल्यांदाच गावठी बियाणे संवर्धन-वृद्धी बँकेची निर्मिती | पुढारी

नाशिकमध्ये राज्यातील पहिल्यांदाच गावठी बियाणे संवर्धन-वृद्धी बँकेची निर्मिती

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा
गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी उपक्रमाची बँकेची निर्मिती केलेल्या कोंभाळणे येथील बायफ इक संचलित पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने उभ्या केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या गावरान बियाणे बँकेला नुकतीच पोपटराव पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी भेट दिली.

आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच विमलताई ठाणगे, ज्येष्ठ नागरिक रोहिदास पादिर व गावातील सुमारे 25 महिला उपस्थित होत्या. सोशल नेटवर्क फोरम यांच्यामार्फत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना उभारून दिलेल्या पाण्याच्या टाकीचे व ठिबक सिंचन उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विषय तज्ज्ञ संजय पाटील, जितीन साठे, योगेश नवले यांनी या भागात बायफ संस्थेमार्फत सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व वृद्धी उपक्रमाची सविस्तर माहिती मान्यवरांना करून दिली. बीज बँक आणि स्थानिक वाहनांचे संवर्धन यावर आधारित काम बघून पोपटराव पवार यांनी याच पद्धतीने गावोगावी काम उभे करण्यासाठी प्रथम माझ्या गावातून मी सुरुवात करेन, असे आश्वासन उपस्थितांना दिले. गावोगावी गावरान बियांच्या बँका स्थापन व्हाव्यात, यासाठी पद्मश्री राहीबाई यांनी घेतलेला बायफच्या मदतीने पुढाकार शेतकर्‍यांच्या फायद्याचा असून देशातील संपूर्ण शेतकर्‍यांनी या विषयाची व्याप्ती समजून घेत कार्य करण्याचे आवाहन पठारे यांनी याप्रसंगी केले. पद्मश्री राहीबाई यांनी बीज बँकेचे सुरू असलेले काम प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधापर्यंत नेण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. सोशल नेटवर्क फोरम यांच्या माध्यमातून प्रमोद गायकवाड यांनी पद्मश्री राहीबाई यांच्या शेतावर उभे केलेले काम गावरान बियाणे निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन विभागीय अधिकारी नितीन साठे यांनी केले. सोशल नेटवर्क फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी या उपक्रमातून जास्तीत जास्त बियांची निर्मिती होऊन शेतकर्‍यांपर्यंत ते पोहोचविण्याचे आवाहन उपस्थित शेतकर्‍यांना केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button