पुणे : माळशिरसमध्ये पहाटे 8 घरांमध्ये चोरी | पुढारी

पुणे : माळशिरसमध्ये पहाटे 8 घरांमध्ये चोरी

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा :  माळशिरस (ता. पुरंदर) येथे रविवारी (दि. 19) पहाटे दोन ते चारच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत आठ घरांत चोरी केली. दागिने व रोख रक्कम अशी सहा लाखांची चोरी केली. जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पंचनामा करून तपासास सुरुवात केली आहे. पहाटे गावात चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर ही माहिती गावच्या पोलिस पाटलांना देऊन जेजुरी पोलिस स्टेशनला कळवण्यात आले.

त्यानंतर बीट अंमलदार चितारे यांनी ताबडतोब माळशिरस येथे येऊन ग्रामस्थांसमवेत पहाणी करून पंचनामा केला. तुकाराम जाधव, पांडुरंग फडतरे, योगेश धर्माधिकारी, बाळासाहेब जगताप, ताराबाई बोरावके, मालन जाधव, चंद्रकांत बनकर, मुक्ताबाई यादव यांच्या घरात चोरी झाली. सुदैवाने या ठिकाणी कोणालाही मारहाण झाली नाही. मात्र, आठ घरांतील चो-यांमध्ये नऊ तोळे सोने व एक लाख रुपये रोख असा जवळपास सहा लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. दुपारी जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी माळशिरस येथे पाहणी केली. गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Back to top button