लोणी काळभोर : पुर्व हवेलीतील मुळा मुठा व भिमा नदी पात्रात दिवसाढवळ्या वाळूमाफिया टोळ्यांकडून नद्यांची लचकेतोड सुरू असून महसूलच्या मेहेरबानीने खुलेआम वाळूचोरी सुरू आहे. हवेली तालुक्याचा महसूल विभाग या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बेकायदा वाळू उपसा जोरात सुरू आहे. यामुळे पूर्व हवेलीतील नद्यामध्ये पर्यावरणाचा -हास होत आहे.
हवेलीच्या पूर्व भागातील मुळा, मुठा व भिमा नदी मुळे या भागातील शेतीला पाणी पुरवठा व पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. मागील तीन महिन्यांपासून नदी पात्रात वाळू माफिया टोळ्यांकडुन उच्छाद मांडला आहे. नदीवर खुलेआम बिनदिक्कतपणे वाळूउपसा सुरू आहे. रात्री उशिरा दहा नंतर ते पहाटे पाच वाजे पर्यंत जेसीबी, पोकलेन व यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा केला जातो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करुन एका अड्ड्यांवर साठा करुन वाळूची विक्री केली जाते.
वाळू माफियानी बेसुमार उपसा केल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने या भागातील पर्यावरण प्रेमीनी बेकायदा वाळू उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. परंतु, हवेली तालुक्याचे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. विभाग या टोळीला अप्रत्यक्ष मदत करत आहे. या टोळक्याकडुन हप्ता वसुलीसाठी महसूलची दलालांची टोळी सक्रिय झाली आहे.
या टोळीकडून वाळू माफियाशी संगनमत करुन हप्ता ठरवून उपसा करण्यास परवानगी देण्याचे काम केले जात आहे. या टोळीचे महसूल कार्यालयाचे कामकाज बंद झाल्यानंतर कार्यालयात बैठका घेण्याचे काम चालूअसते. या बैठकांमुळे तालुक्यातील शासकीय कार्यालये रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु असते त्यामुळे या वाळू माफियांना रोखण्यासाठी आता जिल्हाधिका-यांनी स्वतः लक्ष घालून पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे
तत्काळ कारवाई करू : संजय असवले
यासंदर्भात हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी संजय असवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हवेली तालुक्यातील नदी पात्रातील बेकायदा वाळू उपस्याबाबत तात्काळ दखल घेतली जाईल. एक पथक तयार करुन छापा टाकून जे कोणी बेकायदा वाळू उपसा करत असतील त्यांच्यावर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय महसूल अधिकारी संजय असवले यांनी दै. पुढारी शी बोलताना सांगितले.