राष्ट्रीय आरोग्य गुणांकनात पुणे ‘उणे’; अकोला पहिल्या तर पुणे 22 व्या स्थानावर

राष्ट्रीय आरोग्य गुणांकनात पुणे ‘उणे’; अकोला पहिल्या तर पुणे 22 व्या स्थानावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात, यासाठी पुण्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या गुणांकनात पुणे 'उणे' असल्याची बाब निदर्शनास आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हानिहाय आरोग्य सेवांचा आढावा घेऊन गुणांकक जाहीर केले. यासाठी त्यांनी बाल आरोग्य, माता आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, क्षयरोग निर्मूलन, आयुष्मान भारत योजना, औषधांची उपलब्धता अशा विविध निकषांवर जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणांचे निदान केले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अखत्यारीत येणार्‍या आरोग्य सेवांचा अभ्यास केला.

त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. जिल्हानिहाय गुणांकनात जिल्हा आरोग्य अधिकारी या वर्गवारीमध्ये 26 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे जिल्हा 22 व्या स्थानावर आहे. म्हणजेच जिल्ह्याचा खालून चौथा क्रमांक आला आहे. जिल्ह्याला केवळ 41.91 इतके गुण मिळाले आहेत. आरोग्य अधिकारी वर्गवारीमध्ये अकोला पहिल्या, तर नाशिक शेवटच्या क्रमांकावर आहे. जिल्हा शल्यचिकित्सक वर्गवारीमध्ये 24 व्या स्थानावर म्हणजे खालून तिसर्‍या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्याला केवळ 35.06 गुण मिळाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक वर्गवारीमध्ये कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर, तर सिंधुदुर्ग शेवटच्या क्रमांकावर आहे. आयुक्तांनी तळातील जिल्ह्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी वर्गवारीतील पहिले तीन जिल्हे

  • अकोला : 53.05
  • नागपूर : 51.96
  • सांगली : 51.20

जिल्हा शल्यचिकित्सक वर्गवारीतील पहिले तीन जिल्हे

  • कोल्हापूर : 45.59
  • वर्धा : 45.04
  • अहमदनगर : 44.53

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news