पिंपळनेरला राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर संपन्न | पुढारी

पिंपळनेरला राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर संपन्न

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
प्रसार माध्यमे हे सामाजिक क्रांती करणारे असतात. ते लोकशिक्षक आणि मार्गदर्शक बनून व्यक्तीमत्त्व विकासही घडवून आणणारे असतात. परंतु युवकांनी प्रसार माध्यमांच्या जास्त आहारी न जाता विचारपूर्वकच माध्यमे हाताळणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले. ते बोपखेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के.डी.कदम होते. विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.सी.एन.घरटे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.एस.एन.तोरवणे तसेच प्रा.पी.एम.सावळे व सुनील पवार आदी उपस्थित होते.

कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराप्रसंगी बोपखेल येथे प्रमुख वक्ते म्हणून ‘प्रसारमाध्यमे आणि युवक’ या विषयावर बोलताना डॉ. सतीश मस्के यांनी दवंडी, सनई चौघडा यांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाचा सुरू झालेला प्रवास त्यांनी सांगितला. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदिंविषयी माहिती दिली. एकेकाळी प्रसारमाध्यमाने देशात प्रचंड मोठी क्रांती करत बदल घडवून आणले आहेत. तरुण मोबाईल द्वारे प्रसारमाध्यमाचा योग्य वापर करताना दिसत नाही. त्यामुळे तरुणाई व्यक्तिमत्व विकासापासून दूर आहे. प्रसारमाध्यमेही बदलत असून काही वेळेस सत्यापासून दूर जाताना दिसत असल्याचेही त्यांनी उदाहरणे दिली. श्रवण, वाचन, भाषण व लेखन ही भाषिक कौशल्येही आजच्या युवकांनी प्रसारमाध्यमासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी अवगत करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य प्रा. के.डी. कदम यांनी प्रसारमाध्यमाविषयी व आजच्या युवकाविषयी माहिती सांगून ‘आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आमुची आई’ हे गीत सादर केले. प्राचार्य प्रा.के.डी.कदम यांचा परिचय नंदा सुर्यवंशी यांनी व प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतीश मस्के यांचा परिचय वैभव सुर्यवंशी यांनी करून दिला. कैलास सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. दर्शन पगार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सी.एन.घरटे, प्रा.एस.एन.तोरवणे, प्रा. पी. एम.सावळे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

Back to top button