म्हाडा कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन; किरीट सोमय्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक | पुढारी

म्हाडा कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन; किरीट सोमय्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक

पुढारी ऑनलाईन डेस्क : वांद्रे येथील इमारतीतील अनिल परब यांच्या कार्यालयासह अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. या कारवाईविरोधात म्हाडा कार्यालयाबाहेर ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना म्हाडा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखले. काही कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यानंतर परब मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले. या कार्यालयाचा आणि माझा काही संबंध आहे का, नोटीस कोणी काढली, असा जाब त्यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला. कार्यकर्त्यांना सोडत नाही,तोवर येथून हलणार नाही,अशी भूमिका त्यांनी घेतली.

परब यांचे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. परब यांचे कार्यालय तोडण्यात आल्यानंतर ते पाहण्यासाठी सोमय्या त्या ठिकाणी जाणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना बीकेसी येथे रोखले. सोमय्या येणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर जमल्या होत्या.

किरीट सोमय्या यांनी बिल्डर लोकांची सुपारी घेऊन माझ्यावर आरोप केला आहे. वांद्रेतील गरीबांच्या घरांवर वरवटा फिरणार असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सोमय्या महापालिकेचा मुकादम आहे का? मंत्री असताना गप्प होतो, पण आता शिवसैनिक म्हणून उत्तर देणार. हिंमत असेल तर सोमय्यांनी इथे यावं, त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहे, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयाचं पाडकाम पाहायला येणाऱ्या किरीट सोमय्या यांना दिले आहे. आम्ही पक्ष बदलावा यासाठी दबाव टाकला जात आहे. हा भाजपने सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला डाव आहे, असा घणाघात परब यांनी केला आहे.

म्हडाच्या ५६ वसाहती आहेत सर्व वसाहती पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. वसाहतींमध्ये मराठी गरीब माणसांनी थोडी जागा वाढवली आहे. जेव्हा घरे वाढवली होती तेव्हा या जागा नियमित करण्यासाठी रहिवाशांनी अर्ज केला होता. ही जागा नियमित करता येणार नसल्याचं कळल्यानंतर ती मोकळी केली होती. भाजपने सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला हा डाव आहे. जागेची पाहणी करायला किरीट सोमय्या कोण आहे? म्हाडाचा आधिकारी आहे का? सोमय्यांनी यावं त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहे, असे आव्हान परब यांनी दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button