पुणे : केवळ 27 टक्के बालकांना कोरोनाचा दुसरा डोस | पुढारी

पुणे : केवळ 27 टक्के बालकांना कोरोनाचा दुसरा डोस

पुणे : कोरोना महामारीच्या पहिल्या दोन लाटांनंतर तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला 15 ते 17 वर्षे आणि त्यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, आतापर्यंत शहरात 12 ते 14 वयोगटातील केवळ 27 टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे.

मागील वर्षी 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लसीकरणाच्या आणि मुलांच्या शाळांच्या वेळा न जमणे, एका वेळी तीन किंवा चारच लाभार्थी असणे, अशा विविध अडचणींमुळे लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद अल्प होता. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ’व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 12 ते 14 वर्षे वयोगटातील 1 लाख 4 हजार 572 पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी 44 हजार 91 जणांनी पहिला डोस घेतला असून, हे प्रमाण केवळ 42 टक्के इतके आहे. त्यापैकी 29 हजार 138 जणांनी दुसरा डोस घेतला असून, हे प्रमाण केवळ 27 टक्के आहे. सध्या महापालिकेकडे कॉर्बेव्हॅक्सचे डोस उपलब्ध नसल्याने या वयोगटाचे लसीकरण बंद आहे.

लसीकरणाची स्थिती
वयोगट पात्र लाभार्थी पहिला (टक्के) दुसरा डोस (टक्के)
12 ते 14 1,04,572 44,091 (42) 29,138 (27)
15 ते 18 1,72,828 1,20,212 (69) 81,418 (47)
18 वर्षांपुढील 33,30,334 33,31,965 (100) 31,58,152 (94)

Back to top button