नाशिक : अंगणवाडीसेविकांना लवकरच मोबाइल, गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेचे पाऊल | पुढारी

नाशिक : अंगणवाडीसेविकांना लवकरच मोबाइल, गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेचे पाऊल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गतिमान प्रशासन ही उक्ती प्रत्यक्षात यावी आणि काळानुसार पावले पडावी म्हणून सर्वच विभागांमध्ये डिजिटल माध्यमांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामध्ये अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकेला ऑनलाइन माहिती भरण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून नवीन मोबाइल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सर्व अंगणवाड्यांचे ‘काम ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकेला मोबाइल देण्यात आले होते. जिल्ह्यात 4 हजार 776 अंगणवाड्या, तर 506 मिनी अंगणवाड्या आहेत. येथील साधारणतः 5 हजार 200 अंगणवाडीसेविकांना मोबाइलची आवश्यकता भासते. महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ‘पोषण ट्रॅकर’ या ॲपद्वारे ऑनलाइन भरावी लागते. त्यासाठी अंगणवाडीसेविकांना मोबाइलची आवश्यकता आहे. अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते. प्रत्येक सेविकेला मोबाइलमध्ये कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर (कास) या ॲपद्वारे माहिती भरली जात होती. मात्र, मिळालेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत या अंगणवाडीसेविकांनी मध्यंतरी आंदोलन करत मोबाइल शासनाकडे परत करण्याचा निर्णय घेतला होता. आता या सेविकांना नवीन मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी जिल्हास्तरावरील माहिती मागविली आहे.

नोंदी होणार अपडेट

अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी घेण्यात येतात. मोबाइल मिळाल्यास अंगणवाडीसेविकांना रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही.

हेही वाचा :

Back to top button