Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र | पुढारी

Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेबरोबर गद्दारी करून विरोधकांशी हातमिळवणी करणार्‍या गद्दारांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्दल घडवा आणि गद्दारांना धूळ चारा, असे निर्देश देत स्वस्थ न बसता निवडणुकांसाठी पर्यायी उमेदवार शोधून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी करा, असा कानमंत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिलेदारांना दिला.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.3) मातोश्रीवर पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांच्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. शिंदे गटात शिवसेनेचा आमदार, खासदार गेला असला तरी त्यांच्या जागी पर्यायी उमेदवार शोधा आणि त्याच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी राहा, असा आदेश ठाकरे यांनी दिला. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी अधिकाधिक सदस्य नोंदणी करा. तसेच येत्या 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या नवीन मतदार नोंदणी मोहिमेत शिवसेनेच्या माध्यमातून अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करून युवकांना पक्षात सामील करून घेण्याची सूचनाही ठाकरे यांनी केली. नाशिकच्या शिवसैनिकांकडून ‘मशाल’ चिन्ह असलेली शाल ठाकरे यांना भेट देण्यात आली.

यावेळी खा. अरविंद सावंत, जिल्हा संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख वसंत गिते, विनायक पांडे, शोभा मगर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button