वादग्रस्त वक्तव्यानंतर अमृता फडणवीस यांचा संभाजी भिडेंना टोला | पुढारी

वादग्रस्त वक्तव्यानंतर अमृता फडणवीस यांचा संभाजी भिडेंना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर भिडेंवर सर्व स्तरातून टीका होत होती.

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर आपली मते व्यक्त केली. अमृता फडणवीस म्हणाल्या,”भिडे गुरूजींचा आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहेत. मात्र, महिलांनी काय करावे, कसे जगावे, हे कोणीही सांगू नये” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना टोला लगावला आहे.

संभाजी भिडे हे बुधवारी (दि २) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले होते. भिडे हे मुख्यमंत्र्याची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजी भिडे हे त्या महिला पत्रकारास म्हणाले, आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री भारत मातेचं रूप आहे. भारतमाता विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो.

हेही वाचलंत का?

Back to top button