कात्रजमध्ये अंतर्गत रस्त्यांची चाळण! महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

कात्रजमध्ये अंतर्गत रस्त्यांची चाळण! महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कात्रजमध्ये अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच ड्रेनेज लाईनच्या झाकणांचीदेखील दुरवस्था झाल्याने या भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंतर्गत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर केली जाते. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग 38 व 41 मध्ये शेलारमळा, गुजरवस्ती, दत्तनगर, भारतनगर, शिवशंभोनगर गल्ली 3 अ, 4 व 5, स्वामी समर्थनगर, सुखसागरनगर, गोकुळनगर, टिळेकरनगर, माळीसमाज, साईनगर, महादेवनगर या भागांतील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे.

रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पादचार्‍यांना या रस्त्यांवरून चालणेदेखील कठीण होऊन बसले असून, दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महापालिकेत प्रशासकराज आल्याने अधिकारी याबाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जुना प्रभाग 41 हा 17 किमी क्षेत्रफळाचा मोठा प्रभाग आहे. पावसाळ्यात डांबर प्लांट बंद होता. त्यामुळे तक्रारी वाढल्या असून, प्रभाग 41 साठी एक गाडी तीनच दिवस मिळते. मर्यादित यंत्रणेमुळे खड्डे बुजवताना अडचणी येत आहेत.

                                               -अतुल गुंजाळ, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग.

शिवशंभोनगर भागातील अंतर्गत रस्ता खड्ड्यांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे बुजवणे किंवा दुरुस्ती झाली नाही. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांना धड चालता येत नसून, दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. यामुळे तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी.

                                                                राहुल काळे, राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button