नाशिक : दोन गावांच्या सीमारेषांवरील डोंगरांच्या कुशीत वसलेली दर्‍याईमाता | पुढारी

नाशिक : दोन गावांच्या सीमारेषांवरील डोंगरांच्या कुशीत वसलेली दर्‍याईमाता

नाशिक : रवींद्र आखाडे

हिरवाईने नटलेला निसर्ग, डोंगर उतारावरून खळाळणारा धबधबा, त्यावरील आकर्षक लोखंडी पूल, दाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार हवेची झुळूक अशा आल्हाददायक वातावरणात व शांत अशा रम्य परिसरात डोंगरांच्या कुशीत वसलेले दर्‍याई माता देवस्थान भाविकांसह पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.

शहराच्या उत्तरेला अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मातोरी आणि दरी या दोन गावांच्या सीमारेषांवरील डोंगरांमध्ये दर्‍याई मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याला तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत पेव्हर ब्लॉकचे प्रशस्त पार्किंग आहे. सन 1991 मध्ये दरी ग्रामस्थांनी डोंगराचा कडा खोदून भाविकांसाठी रस्ता केलेला होता. त्यावरच 2006 मध्ये सिमेंटच्या सुमारे 200 पायर्‍या तयार करण्यात आल्या आहेत. पायर्‍या चढून पुढे आल्यावर दोन्ही डोंगरांमधील पुरातन गुहेमध्ये शेंदूर लावलेल्या तेजस्वी सप्तमूर्ती आहेत. आजूबाजूला दाट झाडी व धबधबा आहे. धबधब्यावरील लोखंडी पूल मुख्य आकर्षण ठरत आहे. या पुलावर सेल्फी घेण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. येथून समोर डोंगरावरील मोठे त्रिशूळ व भगवा ध्वज भाविकांचे लक्ष वेधून घेतात. तिथून गंगापूर धरणासह संपूर्ण नाशिकचे दर्शन होते. तसेच, येथे अनेक वनौषधींचा खजिनादेखील आहे. येथील बर्‍याच जुन्या जाणत्या गावकर्‍यांना या वनस्पतींचा अभ्यास आहे.

प्रतिसप्तशृंग गड अन् पर्यटनस्थळाची ओळख
सप्तशृंगगडाप्रमाणेच दर्‍याई मंदिर परिसर डोंगर व हिरवाईने नटलेला आहे. या मंदिरात दर्‍याईच्या स्वयंभू सात मूर्ती आहेत. सप्तशृंगीमातेने दर्‍याई मंदिरात एक दिवस मुक्काम केल्याची आख्यायिकाही जाणकार सांगतात. येथे नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या उत्सवांत गावातून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. पारंपरिक बोहाडा पद्धत आजही येथे पाहावयास मिळते. भक्तांच्या नवसाला पावणारी अशी या देवीची प्रचिती अनेकांना आली आहे. त्यामुळेच हे देवस्थान परिसरातील शेतकरी वर्गाचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत आहे. त्यामुळे शहरालगतचा प्रतिसप्तशृंगगड अशी ओळख आणि एक पर्यटनकेंद्र म्हणूनही हे देवस्थान ओळख निर्माण करीत आहे.

…असा आहे मार्ग
नाशिकहून निघाल्यावर मखमलाबाद व तेथून पुढे तीन किलोमीटर अंतरावर मातोरी लागते. येथील त्रिफुलीपासून उजव्या बाजूच्या दरी रस्त्याने पुढे 2 किलोमीटर गेल्यावर उजव्या बाजूला ‘दर्‍याईमाता देवस्थान’ अशी कमान लागते. या कमानीतून पुढे रस्त्याने अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर दर्‍याई माता देवस्थान आहे.

लोकवर्गणी व इतर शासकीय निधीतून मंदिराच्या खडतर मार्गावर सिमेंट काँक्रिटच्या पायर्‍या केलेल्या आहेत. दर्‍याईमाता वृक्षमित्र परिवारातर्फे लोकसहभागातून नियमित वृक्ष लागवडीसह संगोपन व स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबविले जातात. या भागात सुमारे 15 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून, सामाजिक वनीकरण विभागामार्फत परिसराची देखरेख केली जाते. ग्रामपंचायतीतर्फे पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला असून, लवकरच मोठा निधी मिळून नैसर्गिक विकास होऊ शकतो.
– भारत पिंगळे,
ग्रामपंचायत सदस्य, दरी

हेही वाचा :

Back to top button