विषाणू कसे करतात हृदयाची हानी? | पुढारी

विषाणू कसे करतात हृदयाची हानी?

मेलबोर्न : कोरोना विषाणूसारखे विषाणू हृदयाच्या पेशींची कशी हानी करतात याबाबतची माहिती मिळवण्यात आता संशोधकांना यश आले आहे. यामुळे ‘कोव्हिड-19’ मधून बरे होत असलेल्या रुग्णांमध्ये निर्माण होणार्‍या हृदयाशी संबंधित समस्यांवरील चांगले उपचार शोधण्याची आशा वाढली आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी एका छोट्या समूहावर केलेल्या संशोधनात आढळले की ‘कोव्हिड-19’ संक्रमण हृदयाच्या ऊतींमधील डीएनएची हानी करते. मात्र, एन्फ्लूएंझाने संक्रमित रुग्णांबाबत त्यांच्या ऊतींमधील डीएनएची हानी होत असल्याचे दिसले नाही. संशोधकांनी म्हटले आहे की ‘कोव्हिड-19’ आणि एन्फ्लूएंझा, हे दोन्ही श्वासमार्गाशी निगडीत गंभीर व संक्रामक रोग आहेत. मात्र, ते हृदयाच्या ऊतींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकतात.

संशोधक अरुथ कुलसिंघे यांनी सांगितले की ‘कोव्हिड-19’ ने 2009 मध्ये फैलावलेल्या एन्फ्लूएंझा महामारीच्या तुलनेत अधिक गंभीर व दीर्घकालिक हृदयरोगांना जन्म दिला आहे. मात्र, आण्विक स्तरावर त्याचे कारण काय होते हे आतापर्यंत समजले नव्हते. संशोधनात आम्हाला ‘कोव्हिड-19’ शी संक्रमित रुग्णांच्या हृदयाच्या ऊतींमध्ये विषाणूचे अंश सापडले नाहीत; पण त्यांच्या डीएनएचे नुकसान आणि त्यांच्या डागडुजीशी संबंधित बदल जरूर दिसले.

Back to top button