उत्सव विजयाचा | पुढारी

उत्सव विजयाचा

वाईटावर चांगल्याचा विजय या भावनेतून दसरा सणाचे आपल्या संस्कृतीत आगळे महत्त्व आहे. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. त्यासाठी अनेक कथांचाही संदर्भ दिला जातो. भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये हा सण उत्साहाने साजरा केला जातो. साजरा करण्याची पद्धत वेगळी असली तरीही वाईट शक्तींचा पराभव आणि दुर्गेच्या विविध रूपांतील सकारात्मक शक्तीची पूजा असाच हेतू प्रामुख्याने या सणाच्या निमित्ताने दिसून येतो. म्हणूनच या सणाला विजयाचा उत्सव असेही म्हटले जाते.

भारतीय सणांच्या आणि त्या निमित्ताने साजरा केल्या जाणार्‍या उत्सवांच्या परंपरेत दसर्‍याला विशेष महत्त्व आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवसाचे महत्त्व प्राचीन ग्रंथ, पुराण, लोकसाहित्य यातून वेळोवेळी आपल्याला समजत असते. दसर्‍याचे महत्त्व अनेक अर्थाने मानले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय या अर्थाने देशभरातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. दसरा हा सण साडेतीन मुहूतांपैकी एक पूर्ण शुभमुहूर्त मानला जातो. मुहूर्तासाठी साडेतीन आकडा का? तर त्यामागेही एक कारण आहे.

पूर्वीच्या काळी पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, औटकी अशा आकडेवारीमध्ये पाढे असायचे. यामध्ये औटकी हा सर्वात मोठा आकडा होता. औटकी म्हणजे साडे तीन. त्यामुळे सर्वात मोठा आकडा म्हणून साडेतीन मुहूर्त निर्माण झाले. साडेतीन या आकड्याला महत्त्व प्राप्त झालेे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा आणि बलिप्रतिपदा या मुहूर्तांना साडेतीन मुहूर्त म्हटले जाते. प्राचीन काळी राजे विजयादशमीच्या दिवशी मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करत असत आणि त्यानंतर मोहिमेवर जात असत. त्यामुळे या दिवसाला सीमोल्लंघन असेही म्हटले जाते.

दसर्‍याच्या मुहूर्तावर पाळण्यात येणार्‍या काही प्रथा महत्त्वाच्या मानल्या जातात. यामध्ये सीमोल्लंघन, शमीपूजन, शस्त्रपूजा म्हणजेच हत्यारे, वाद्य, उपकरणे, वह्या-पुस्तके, ग्रंथ, पोथ्या यांची पूजा यासारख्या पारंपरिक प्रथांचा समावेश होतो. आपट्याच्या वृक्षाचीही या दिवशी पूजा करतात. त्याची पाने आप्तस्वकियांना वाटतात. जुने भांडणतंटे विसरून चांगल्या विचारांचे आदान-प्रदान केले जावे, अशी भावना ही पाने वाटण्यामागे व्यक्त केली जाते.

विजयादशमी का साजरी केली जाते आणि ती कशाप्रकारे साजरी करावी, याबाबत आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक पारंपरिक कथा प्रचलित आहेत. दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला आणि विजय प्राप्त केला. त्यामुळे विजयादशमी साजरी केली जाते. त्रेतायुगात आणि द्वापारयुगातही दसरा साजरा करण्यामागचे संदर्भ आढळतात. त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी दहा तोंडे असणार्‍या रावणाचा वध करून विजय प्राप्त केला. त्या विजयाचा आनंदोत्सव म्हणजे दसरा सण होय. रावणाला दहा तोंडे होती, म्हणून त्याच्यावर विजय मिळवला, यासाठी या सणाला ‘दशहरा’ असेही म्हटले जाते. – जगदीश काळे

Back to top button