Kidnap : पैशांसाठी मामा-भाच्याचे अपहरण, नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरातील घटना | पुढारी

Kidnap : पैशांसाठी मामा-भाच्याचे अपहरण, नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरातील घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याचे संदेश सोशल माध्यमांवर वार्‍यासारखे फिरत होते. त्यामुळे स्वत: पोलिस आयुक्तांनी या अफवा असल्याचे स्पष्ट करताना कोणीही यावर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचे आवाहन केले होते. मात्र, शहरात लहानग्यांचे नव्हे तर मोठ्यांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय आहे की काय? अशी घटना आडगाव शिवारातील जत्रा हॉटेल परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांना अद्यापपर्यंत अपहरण केलेल्यांची सुटका तसेच अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही.

काही दिवसांपूर्वीच नाशिकरोड येथील एका व्यापार्‍याचे अपहरण करून मालेगाव येथे हत्या केली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच जत्रा हॉटेल परिसरात अशा प्रकारची घटना समोर आल्याने, अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि.21) योगेश धर्मा भालेराव (वय 45, रा. आय विंग, फ्लॅट 604, पार्क साइट, हनुमाननगर) व महेश गायकवाड (वय 40) हे दोघे मामा-भाचे रात्री 11 च्या सुमारास जत्रा हॉटेल परिसरात फेरफटका मारत होते. अशात या दोघांकडे विनीत (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीने पैशांची मागणी केली. मात्र, योगेश भालेराव यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर विनीत आणि त्याच्या अन्य चार साथीदारांनी भालेराव आणि गायकवाड या दोघांचे अपहरण केले. त्याचबरोबर पैसे दिले नाही, तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. दरम्यान, योगेश भालेराव यांचा मुलगा रोहन भालेराव याने या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, बुधवारी घडलेल्या घटनेचा उलगडा करण्यास अद्यापपर्यंत पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर तपास करीत असून, त्यांना याबाबत विचारले असता तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button