पिंपरी : ऑनलाईन दंड आकारल्याने वाहतूक पोलिसाला दमबाजी | पुढारी

पिंपरी : ऑनलाईन दंड आकारल्याने वाहतूक पोलिसाला दमबाजी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रिक्षावर ऑनलाईन दंड आकारल्याच्या रागातून दोघांनी मिळून पोलिस कर्मचार्‍याला दमबाजी केली. हा प्रकार बुधवारी (दि. 21) सायंकाळी साई चौक, पिंपरी येथे घडला. पोलिस हवालदार ऋषिकेश पाटील यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आनंद सुरेश हिरेकर (वय 36), एक महिला (दोघे रा. वाघेरे चाळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे पिंपरी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साईचौक, पिंपरी येथे वाहतूक नियमन करत होते.

दरम्यान, त्यांनी आरोपी आनंद हिरेकर याच्या रिक्षावर ऑनलाईन दंड आकाराला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आरोपींना समजावून सांगत असताना फिर्यादी पाटील यांनी आपल्या नातेवाईक महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आनंद हिरेकर याला अटक केली आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button