नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात | पुढारी

नाशिक : उद्धव ठाकरे न्याय देतील, भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर शिवबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महापौर निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधून बंडखोरी केलेल्या 12 माजी नगरसेवकांची आगामी निवडणुकीतील उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळेच 12 मधील माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.23) शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उर्वरित नगरसेवकही शिवसेनेसह अन्य पक्षांचा आसरा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेत सत्ता काळातील मागील अडीच वर्षे ही भाजपसाठी तारेवरची कसरतच ठरली. कारण याच काळात झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपमधील जवळपास 12 नगरसेवकांनी भाजपविरोधात बंड पुकारले होते. त्यामुळे बहुमत असूनही महापौरपदाची निवडणूक हातून जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, नाशिकचे माजी पालकमंत्री व विद्यमान वैद्यकीय व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अंतिम टप्प्यात बंडखोरांची नाराजी दूर केली आणि महापौरपद भाजपच्या गळ्यात सुखासुखी पडले. अन्यथा, शिवसेनेचा महापौर नाशिक महापालिकेत विराजमान झाला असता. भाजपमधील अंतर्गत वाद आणि पदावरून डावलण्यात आल्याने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे खंदे समर्थक असलेले माजी सभागृहनेते कमलेश बोडके यांच्यावर 12 नगरसेवकांची जबाबदारी सोपविली होती. निवडणुकीच्या दिवसापर्यंत 12 ही नगरसेवक परतणार की नाही, असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला होता.

या 12 नगरसेवकांमध्ये पूनम धनगर, पूनम सोनवणे, सीमा ताजणे, नीलेश ठाकूर, सुनीता पिंगळे, विशाल संगमनेरे, मच्छिंद्र सानप, कोमल मेहरोलिया, पल्लवी पाटील, सुमन सातभाई आदींचा समावेश होता. या नगरसेवकांमुळे भाजपची नाशिक मनपातील सत्ताच धोक्यात आली होती. परंतु, रुसवेफुगवे दूर करून भाजपने त्यांची मते मिळवली असली, तरी निवडणुकीनंतरच्या काळात या 12ही नगरसेवकांना या ना त्या कारणाने भाजप पदाधिकार्‍यांनी नेहमीच दुर्लक्षित केले. त्याचबरोबर भाजपच्या अंतर्गत झालेल्या बैठकीतही संबंधितांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून गुफ्तगू झाल्याने उमेदवारी धोक्यात आलेल्या नगरसेवकांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश करणेच योग्य समजले असून, त्याचाच एक भाग म्हणून पूनम धनगर यांनी शुक्रवारी (दि.23) शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमधून माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, सीमा ताजणे यांनी या आधीच प्रवेश केला आहे. शशिकांत जाधव आणि पल्लवी पाटील, विशाल संगमनेरे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, निवडणुका लांबल्याने ही चर्चाही थांबली.

भाजपमधील वरिष्ठांकडून होत असलेला अपमान आणि सततचे डावलणे, याला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्याला न्याय देतील, असा विश्वास आहे. प्रभागातील माझ्या नागरिकांना विश्वासात घेऊनच मी शिवसेना पक्षाची निवड केली आहे. भाजपमधील पदाधिकार्‍यांना आलेला सत्तेचा माज फार काळ टिकणार नाही.
– पूनम धनगर, माजी नगरसेविका

शिवसेनेत पूनम धनगर यांना योग्य तो न्याय मिळेल. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये तथ्य असल्यानेच त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडलेला असावा. अजूनही इतर नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

हेही वाचा :

Back to top button