नाशिक : निवडणूक शाखेच्या विशेष मोहिमेत 80 हजार मतदारांचे आधार सीडिंग | पुढारी

नाशिक : निवडणूक शाखेच्या विशेष मोहिमेत 80 हजार मतदारांचे आधार सीडिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निवडणूक शाखेने रविवारी (दि. 11) जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांत मतदान कार्ड हे आधारला जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार 55 मतदारांचे मतदान कार्ड हे आधारशी सीडिंग करण्यात आले. बागलाणमध्ये सर्वाधिक 12 हजार 137 मतदारांचे आधार हे मतदान कार्डाशी जोडण्यात आले असताना नाशिक शहरात मोहिमेला अल्प प्रतिसाद लाभला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात आधारला मतदान कार्डला जोडण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत जिल्हा निवडणूक शाखेने तब्बल 4 हजार 681 मतदान केंद्रांवर एकाच वेळी विशेष मोहीम घेतली. या मोहिमेत बीएलओंमार्फत (बूथ लेव्हल अधिकारी) आधार सीडिंगसाठी मतदारांकडून नमुना अर्ज क्रमांक 6 भरून घेण्यात आले. या विशेष मोहिमेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 80 हजार 55 मतदारांचे मतदान कार्ड हे आधारशी संलग्न करण्यात आले. त्यातही नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात बागलाणनंतर येवल्यात सर्वाधिक 8 हजार 489 मतदारांचे आधार सीडिंग करण्यात आले. तर मालेगाव बाह्यमध्ये सर्वांत कमी 2266 मतदारांची नोंदणी करण्यात आली.

असे झाले आधार सीडिंग
नांदगाव 7428, मालेगाव मध्य 4274, मालेगाव बाह्य 2266, बागलाण 12137, कळवण 4968, चांदवड 6087, येवला 8489, सिन्नर 3674, निफाड 6314, दिंडोरी 6234, नाशिक पूर्व 2731, नाशिक मध्य 3073, नाशिक पश्चिम 3353, देवळाली 5171, इगतपुरी 3856, एकूण 80055.

हेही वाचा :

Back to top button