नगर : सोनेतारण फसवणूक दीड कोटीच्या घरात | पुढारी

नगर : सोनेतारण फसवणूक दीड कोटीच्या घरात

नगर; पुढारी वृत्तसेवा: येथील शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज घोटाळा उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बनावट सोनेतारण कर्जातून नगर शहर बँकेला व इतर काही पतसंस्थांना कोट्यवधी रूपयांना चुना लावण्यात आला आहे. फसवणुकीचा आकडा दीड कोटीवर पोहचला असून, बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर अजय कपाले याच्या केडगावातील गाळ्यातून बनावट हॉलमार्क मशीन पोलिसांनी हस्तगत केल्याने बनावट सोने बनविण्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपींच्या पोलिस कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

शहर सहकारी बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्यूअर अजय किशोर कपाले (वय 33, रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (वय 28), ज्ञानेश्वर रतन कुताळ (वय 28, दोघे रा. चिपाडे मळा, सारसनगर), सुनील ज्ञानेश्वर अळकुटे (वय 38, रा. सद्गुरू टॉवर्स, तपोवन रोड, सावेडी) या चौघांविरुद्ध बँकेची सुमारे 26 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा बुधवारी (दि. 7) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक करून गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. तसेच, याप्रकरणी श्रीतेज पानपाटील (रा. भिंगार) व संदीप कदम (रा. निमगाव वाघा, ता. नगर) या अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने अटकेतील सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले याच्या केडगाव येथील गाळ्यातून बनावट हॉलमार्क मशीन जप्त केले आहे. शहर सहकारी बँक आणि इतर पतसंस्थांच्या पॅनेलवर घोटाळेबाज अजय कपाले हा गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम करत होता. त्यामुळे अनेक कर्जदारांच्या माध्यमातून कर्ज उचलून बँकांची व पतसंस्थांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत दीड कोटीची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बेन्टेक्सचे दागिने भासविले सोन्याचे!
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कचे चिन्ह असल्यास ते सोने खरे असल्याची खात्री होते. अजय कपाले याने हॉलमार्क मशीनद्वारे बेन्टेक्ससह इतर धातूंच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क तयार करून, अनेकांना कर्ज मिळवून दिल्याची शंका पोलिसांना आहे.

Back to top button