LokSabha Elections2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित | पुढारी

LokSabha Elections2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित झाला असून, ते 29 एप्रिल रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्यानिमित्त पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा पथक (एसपीजी) शहरात दाखल झाले आहे. पथकाकडून सभेच्या ठिकाणाची तसेच पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गाची पाहणी करण्यात येत आहे. मात्र, अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान मोदी हे 29 एप्रिल रोजी पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रेसकोर्स येथील मैदानात जाहीर सभा होणार आहे.

तसेच पंतप्रधान मोदी यांची शहरात वाहनातून प्रचार फेरी (रोड शो) होणार आहे. मात्र, या प्रचार फेरीचा मार्ग अद्याप राजशिष्टाचार विभागाला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत कळविण्यात आलेला नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच राजभवन येथे रवाना होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौर्‍यानिमित्त जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक बंदोबस्ताची आखणी करीत आहेत. याशिवाय राजशिष्टाचार विभागात पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौर्‍यानिमित्त राजशिष्टाचारासाठी खास अधिकार्‍यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

आचारसंहिता काळातही राजशिष्टाचार कायम

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळातही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना राजशिष्टाचार कायम असतो. या महत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीआयपी) आचारसंहिता काळातही राजशिष्टाचार पुरविण्यात येतो.

हेही वाचा

Back to top button