मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लाखो प्रवाशांना दिवस-रात्र त्यांच्या ईच्छितस्थळी सुरक्षित पोहोचविणारे लोकलचे मोटरमन प्रवाशांसाठी 'लाईफ सेव्हर्स'ची भूमिका बजावत आहेत. मध्य रेल्वेवर एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत मोटरमननी विविध अपघातात प्रसंगावधान दाखवत 12 जणांचा जीव वाचविला आहे. यापैकी चार घटना ऑगस्ट महिन्यात घडल्या आहेत.
सध्या मध्य रेल्वेवर दिवसाला 32 ते 33 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यांच्याकरिता दिवसाला लोकलच्या एक हजार 810 फेर्या चालविण्यात येतात. नागरिक विविध कारणांनी रुळांवरुन ये-जा करतात. अनेकदा आत्महत्या करण्यासाठी नागरिक रुळावर येतात. अशा वेळी मोटरमन प्रसंगावधान दाखवत आपातकालीन ब्रेक लावून लोकल थांबवितात आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवितात. ऑगस्ट महिन्यात तर एका तरुणीने प्रियकराने लग्नास नकार दिला म्हणून रुळावर आत्महत्या करण्याचा दोनदा प्रयत्न केला. तिला मोटरमन आणि आरपीएफ,रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात आले.