एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र | पुढारी

एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : मुदती पुर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या १० नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी आज (दि.१८)अपात्र ठरवले आहे.  यामूळे जिल्ह्यातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब प्रचंड धक्कादायक मानली जात आहे. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना रात्री ९ वाजता त्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत.

भुसावळ नगरपालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून आले हाेते.  त्यांचा २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होणार हाेता. मात्र यापूर्वीच १७ डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता.

नियमानुसार भाजपातून बाहेर पडताना राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे दाखल झालेली याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करीत वरील नगरसेवकांना एका कार्यकाळासाठी (पाच वर्ष) अपात्र ठरवले आहे.

एका माजी नगरसेविकेने केली याचिका दाखल 
पक्षांतर कायद्यानुसार अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजपच्या एका माजी नगरसेविकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. अनेकदा या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदारांचा अर्ज मान्य केला.

Back to top button