राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ | पुढारी

राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा शैक्षणिक हब होण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टतर्फे संचालित आशियातील पहिले कायदा विद्यापीठ गोव्यात होणार आहे. धारबांदोडा येथे हा प्रकल्प साकारणार आहे. त्याचा प्रारंभ सांकवाळ येथे गुरुवारी होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी 4.30 वाजता प्रस्तावित कायदा विद्यापीठाचे उद्घाटन होईल. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवयी, सूर्या कांत आणि सुंदरेश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली. यावेळी सोबत उपाध्यक्ष एस. प्रभाकरन, अ‍ॅड. अपूर्वकुमार शर्मा तसेच बार कौन्सिल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. गोवा सरकारने धारबांदोडा येथे 50 एकर जागा कायदा विद्यापीठासाठी दिली आहे. त्या जागेत प्रकल्प उभा होण्यास काही काळ लागणार असल्याने यंदापासून सरकारच्या सांकवाळ येथील जागेत कायदा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन विभागात मिळून 150 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात 20 टक्के जागा गोवेकर विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. बी.ए., एलएल.बी. व एलएल.एम., पीएच.डी. या पदव्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण येथे दिले जाईल. पंचतारांकित वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. तसेच धारबांदोडा येथील प्रकल्प सुरू झाल्यानंतर जागा वाढविल्या जाणार आहेत, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.

विद्यमान कायद्यासह भारताच्या पुरातन कायद्याचा अभ्यास या विद्यापीठात होईल. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास शिकविण्यासाठी जागतिक स्तरावरील मार्गदर्शक नेमले जातील. जुलैमध्ये इंट्रन्स परीक्षा घेऊन विद्याथ्यांची निवड होऊन 1 सप्टेंबरपूर्वी प्रत्यक्ष वर्ग सुरू केले जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. हे विद्यापीठ सरकारी नव्हे, ते बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्ट संचलित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button