नाशिक : माजी विद्यार्थी भेटले तब्बल 32 वर्षांनी..., 'जून्या आठवणी झाल्या ताज्या' | पुढारी

नाशिक : माजी विद्यार्थी भेटले तब्बल 32 वर्षांनी..., 'जून्या आठवणी झाल्या ताज्या'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील मर्‍हळ येथील देवराम महाराज हायस्कूल या शाळेतील माजी विद्यार्थी तब्बल 32 वर्षांनी एकत्रित भेटले अन् या भेटीच्या दिवशी या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रेमाचे आलिंगन देत जुन्या आठवणी ताज्या केल्या.

खर तर इतक्या वर्षांनी एकत्रित भेटणार म्हटल्यावर सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती की कधी आपण सर्व एकदाचे भेटतो आहे. शालेय जीवनातील आपले मित्र इतक्या वर्षांनी भेटणार आहे म्हटल्यावर प्रत्येक जण काय करत असेल कसा दिसत असेल याचाच विचार प्रत्येकाच्या मनात सुरू होता आणि अखेर तो दिवस आला आणि सर्वांचीच आतुरता एका क्षणापुरती स्तब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियामुळे अनेकांचा संपर्क एकमेकांशी येत होता. मात्र ऑनलाइन असलेली ही मैत्री काही बहरून येत नव्हती. त्यासाठी सर्वांनीच निश्चय केला आणि गेट टुगेदर करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात केवळ विद्यार्थी मित्र-मैत्रिणीच नव्हे, प्रत्येक मित्रांचे कुटुंब आणि शिक्षकही सहभागी झाले होते. यामुळे या मेळाव्याची रंगत वाढली होती. शालेय जीवनात प्रत्येक शिक्षकाकडून होणारे ज्ञानार्जन आणि शिक्षा या आठवणींबरोबरच अनेकांनी शाळेतील आठवणींचा मार्ग मोकळा करून दिला.

गणित हा विषय हसत खेळत शिकविणारे शिक्षक आर. डी. आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सिन्नर येथे नुकताच पार पडला. यावेळी माजी शिक्षक व्ही. के. दिघे, गोडगे, एम. जी. कुर्‍हे, बी. बी. भालेराव, तांबे, कडलग, सुधाकर वाघ, बी. के. कुटे, एम. पी. आढाव आदी शिक्षक उपस्थित होते. मेळाव्यासाठी विनोद बैरागी, संपत आंधळे, भगवान सानप, आर. के. सांगळे, संदीप पाटील, विजय इलग आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

Back to top button