नगर : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मध्ये जिल्ह्यात 646 किलोमीटर रस्त्यांचे काम होणार आहे. यासाठी मात्र, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वापरला जाणार आहे. यंदाच्या वर्षांसाठी तब्बल 64 कोटी रुपये तर आगामी वर्षात देखील एवढाच निधी वर्ग होणार आहे. एकंदरीत 129 कोटी 20 लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी वर्ग होणार आहे.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती काम करीत आहे. या समितीवर जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 40 प्रतिनिधी सदस्य म्हणून काम पाहात आहेत. गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 540 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या रक्कमेतून जिल्हा परिषदेसह इतर विभागांतील विकास कामे करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी या निधीचा मोठा हातभार लागत आला आहे.
राज्यभरातील 10 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे मुख्यमंत्री सडक योजनेच्या दुसर्या टप्प्यात करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ज्या त्या जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने बुधवारी शासन आदेश देखील जारी केला आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 646 कि.मी. रस्त्याची कामे होणार आहेत. यासाठी 484 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
त्यासाठी 2022-23 या आर्थिक वर्षातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीतून 64 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सडक योजनेकडे वर्ग होणार आहे. त्यानंतरही 2023-24 या आर्थिक वर्षात देखील 64 कोटी 60 लाख रुपयांचा निधी वर्ग होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनी सांगितले आहे.
इतर विभागांच्या खर्चाला लागणार कात्री
जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण घटकातून जिल्ह्यातील रस्ते, अंगणवाडी, शाळा खोल्या व इतर इमारतीचे बांधकामावर खर्च केला जात आहे. याशिवाय पाटबंधारे, बांधकाम, समाजकल्याण, आरोग्य, महसूल, पोलिस आदी विविध विभागांची कामे या घटकातून होत आहेत. यासाठी पाचशे ते साडेपाचशे कोटींचा निधी उपलब्ध होतो. गेल्या दोन वर्षांत कोरोनासाठी दीडशे कोटी रुपये वळती केले होते. त्यामुळे इतर विकासकामांच्या निधीला कात्री लागली होती.या सडक योजनेमुळे इतर विभागांच्या कामाला देखील कात्री लागणार आहे.
हेही वाचा: