पोर्टलमध्ये अडकल्या गुरुजींच्या बदल्या; ११०० शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत | पुढारी

पोर्टलमध्ये अडकल्या गुरुजींच्या बदल्या; ११०० शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत

नगर : पुढारी वृत्तसेवा

कोव्हीडमुळे गेली दोन वर्षे बदली न झाल्याने दुर्गम, अवघड, पेसा क्षेत्रात अनेक शिक्षक जणू अडकून पडले आहेत. दिव्यांग, विशेष संवर्ग 1,2,4 मधील बदली हवी असणारे व कुटूंबापासून दूर असणारे शिक्षकही बदलीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, मे महिना संपत आला तरीही शासनाचे ऑनलाईन पोर्टल बंद असल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 2019 पासून शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत. यात 2020 आणि 2021 मध्ये बदल्या झाल्या नाहीत. त्या आता यावर्षी होणार आहेत. मात्र सध्याच्या 2022 मधील धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 31 मे पूर्वी 10 टक्के प्रमाणे बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वीच जिल्ह्यातील सर्व 11 हजार शिक्षकांची माहिती ग्रामविकास विभागाकडे सादर केली आहे. यातून 1100 पेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या होतील, असा अंदाज आहे.

शिक्षकांची कुंडली ग्रामविकासकडे

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व माहिती अद्यावत करून बदली पात्र शिक्षकांची माहिती, रिक्त जागांचा तपशील, शिक्षकांच्या जन्म तारखा, आधार, पॅन नंबर, शालार्थ आयडी आणि शिक्षक बेस माहिती तयार करून ग्रामविकास विभागाला सादर केलेली आहे.

पोर्टलची चाचणी नेमकी कधी?

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरची तांत्रिक चाचणी अद्याप झालेली नसल्याने बदल्या लांबल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समजली. त्यामुळे नेमकी ही चाचणी होणार कधी, या चिंतेने शिक्षकांमध्येही अस्वस्थता दिसत आहे. दरम्यान, पोर्टलमध्ये येणार्‍या अडचणी पाहता शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता जून उजडणार असल्याचेही स्पष्टपणे दिसत आहे.

बदलीसाठी पात्रतेचे निकष

सर्वसाधारण कार्यक्षेत्रात दहा वर्षे आणि एकाच शाळेवर पाच वर्षे पूर्ण करणारे शिक्षक, अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा करणारे शिक्षक बदलीस आहेत. तसेच संवर्ग एकमधील दुर्धर आजाराने ग्रस्त, मतीमंद मुलांचे पालक, पती आणि पत्नी एकत्रीकरण हे देखील बदलीसाठी पात्र आहेत.

बदल्यांची प्राथमिक तयारी पूर्ण

यु डायसनुसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्यावत करणे, शिक्षकांचे रोष्टर अद्यावत करून त्यास विभागीय मंजूरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांची समानिकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणूका करणे आदी सूचना विचारात घेवून बदल्यांची प्राथमिक तयारी पूर्ण झालेली आहे.

 

31 मे पर्यंत बदली करण्याचे शासन धोरण आहे. मात्र, मे महिना संपत आला तरीही अद्याप बदली पोर्टल सुरू झालेले नाही. अखिल संघाचे राज्याध्यक्ष देविदास बसवदे, सचिव कल्याण लवांडे यांनी नुकतीच ग्रामविकास मंत्री मुश्रीफ व सचिव वळणी यांची भेट घेऊन बदली प्रक्रियेस वेग देण्याची मागणी केलेली आहे.
-शरद वांढेकर, जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षक संघ

जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत प्रथम संच मान्यतेनुसार शिक्षकांचे समायोजन होणे आवश्यक आहे. सन 2018-19 बदलीमध्ये रॅन्डम राऊंडला गेलेल्या शिक्षकांचा प्राधान्याने विचार व्हावा. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी या बदल्या होणे अपेक्षित आहे.
-दिनेश खोसे, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक भारती

हेही वाचा :

 

Back to top button