धुळे : घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना मोफत पाणी, ‘या’ ग्रामपंचायतीचा निर्णय | पुढारी

धुळे : घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना मोफत पाणी, 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील कासारे ग्रामपंचायतच्या वतीने गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचे (आर ओ) कार्ड वाटप लोकनियुक्त सरपंच विशाल बापू देसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्डद्वारे फक्त ५ रुपयांत २० लिटर शुद्ध थंडगार पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत कार्यालया मार्फत ग्रामस्थांना विशेष योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ग्रामस्थाने आपल्या घराची चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी संपूर्ण भरली असेल त्याला २० लिटर पाण्याचा जार मोफत देण्यात येणारे आहे. यातून ग्रामपंचायतीस कर वसुली करण्यास मदत होईल आणि जे ग्रामस्थ नियमित घरपट्टी भरणार आहेत त्यांना मोफत जारचा लाभ देखील मिळेल. आजपासून सुरु करण्यात आलेल्या शुद्ध पाण्याची योजने अंतर्गंत पहिल्या १५ दिवस मोफत पाणी देण्यात येणार आहे. तशी गावात दवंडी देत व सार्वजनिक फलकावर देखील प्रसिद्धी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य बाळा खैरनार, रवींद्र चव्हाण, विलास सोनवणे, मिलिंद सोनवणे, विलास देसले, ग्रामविकास अधिकारी अनिल तोरवणे, एल. आर. देसले, दीपक जाधव, रमेश महाले, शिवराम काकूस्ते, आनंदा मिस्तरी, ललित बोरसे, भैय्या देसले, ग्रामपंचायत कर्मचारी भटू ठाकरे, बाळा देसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कासारे ग्रामपंचायत कार्यालयच्या या योजनेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button