भेंडवळ घटमांडणी भाकीत; 'यंदा पीकपाणी साधारण,राजा स्थिर पण..' | पुढारी

भेंडवळ घटमांडणी भाकीत; 'यंदा पीकपाणी साधारण,राजा स्थिर पण..'

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : येणार्‍या वर्षातील पीक पावसाची परिस्थिती, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तवणारी आणि विदर्भात  प्रसिद्ध असलेली भेंडवळ (ता.जळगाव जामोद) येथील पारंपारिक घटमांडणीचे भाकित आज (दि. ४) सकाळी जाहीर करण्यात आले.

भेंडवळ घटमांडणी भाकित : सुमारे 350 वर्षांची परंपरा

सुमारे 350 वर्षांच्या परंपरेनुसार दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या सायंकाळी शिवारातील एका शेतात खड्डा खोदून त्यात पाणी भरलेला मातीचा घट ठेवला जातो. त्यावर कुरडया, पुरी, भजी आदी तळलेले पदार्थ तसेच बाजूला पानसुपारी व विविध १८ प्रकारच्या  कडधान्यांची मांडणी केली जाते. रात्रीतून या पदार्थात व  घटामध्ये काही बदल झालेले दिसून येतात. त्यावरून वर्षभराचा हंगाम, पीक पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत या घटमांडणीतून  वर्तविले जाते. याकडे शेतकरी वर्ग, व्यावसायिक व  राजकीय लोकांचेही लक्ष लागून असते.  भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे या घटाचे सूक्ष्म निरीक्षण  करून अनुमान  जाहीर करतात. या घटमांडणी प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरीही अनेक शेतकरी यावर  विश्वास ठेऊन आपलं वर्षभराचं शेतीविषयक नियोजन करतात.

भेंडवळ घटमांडणी भाकित

पीकपाणी
कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील व भावही चांगला मिळेल. तर वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशभरात पीक चांगले येईल. मात्र पिकांना अपेक्षित भाव मिळणार नाही.
राजकीय भाकीत
राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील; परंतु देश आर्थिक अडचणीत असेल.
पाऊस सर्वसाधारण
पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे, अवकाळी पाऊस वर्षभर राहील.
आरोग्य विषयक
 देशात व राज्यात गतवर्षीसारखी रोगराई  नसेल.
हेही वाचलंत का?

Back to top button