देवेंद्र फडणवीस म्हणाले, पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत | पुढारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : म्हाडा, आरोग्य विभाग, टीईटी या तीनही परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या पेपरफुटीच्या घोटाळ्यांचे लागेबांधे थेट मंत्रालयापर्यंत जोडले गेले आहेत. ज्या कंपन्या अपात्र आणि काळ्या यादीत टाकण्यात आल्या होत्या, त्या कंपन्यांना परीक्षा घेण्याची कंत्राटे देण्यात आली. टीईटी घोटाळ्यात तर मंत्र्यांच्या आजूबाजूचेच काही लोक सामील आहेत. त्यामुळे पुणे पोलीस सध्या चांगला तपास करीत असले तरी त्यांचे हात लवकरच बांधले जाणार आहेत. त्यामुळे या सर्व पेपरफुटीच्या घोटाळ्यांची एकत्रितरीत्या सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला.

विविध नोकरभरतीत उघडकीस आलेले घोटाळे, त्यात झालेल्या अटकेच्या कारवाया आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या वतीने 293 अन्वये चर्चा उपस्थित करण्यात आली. या चर्चेला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पेपरफुटीच्या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधताना मंत्र्यांचाही या घोटाळ्यांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला

राज्यात नोकरभरती प्रक्रिया आणि परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कुंपणच शेत खात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीकडून मराठवाडा, विदर्भावर अन्याय मराठवाडा आणि विदर्भाची हक्‍काची वैधानिक विकास महामंडळे रद्द करून राज्य सरकारने या विभागातील लोकांची कवच- कुंडले काढून घेतली आहेत. वैधानिक विकास महामंडळांचा मुडदा पडल्याने राज्यपालांना निर्देश देण्याचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या हक्‍काचा निधी पळवला जात आहे, असा हल्ला फडणवीस यांनी चढवला.

Back to top button