राज्यातील २५ हजार महिला बेपत्ता | पुढारी

राज्यातील २५ हजार महिला बेपत्ता

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोच्या अहवालातील 2020 अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 24 हजार 579 महिला बेपत्ता आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यात येत आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यांचा दोन महिन्याच्या आत तपास करणे चौकशी अधिकार्‍यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी प्रश्नोत्तराद्वारे दिली आहे.

राज्यात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित खटले प्रलंबित असल्याच्या संदर्भात प्रकाश फातर्पेकर, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील 63 हजार 252 बेपत्ता महिलांपैकी 40 हजार 095 महिला सापडल्या, तर 4 हजार 517 बेपत्ता अल्पवयीन मुलींपैकी 3 हजार 95 अल्पवयीन मुली सापडल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, गेल्या सात वर्षात 25 हजार 469 सायबर गुन्हांची नोंद झाली आहे. त्यापैकी 6 हजार 306 गुन्हे उघडकीस आले. यापैकी 383 प्रकरणे न्यायालयात निकाली निघाली असून त्यामध्ये 99 आरोपींना शिक्षा झाली अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी उत्तरात दिली.

25 हजार कैद्यांची क्षमता, कोंबले 36 हजार

राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक 35 हजार 565 कैदी आहेत. मुंबई, येरवडा, ठाणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक, तळोजा या 9 मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक 25 हजार 165 कैदी आहेत. सोलापूर, येरवडा व विसापूरमध्ये खुले कारागृह , चंद्रपूर, यवतमाळ, नगर, नागपूर, बुलडाणा, व सातारा येथे अतिरिक्त नव्या कोठड्या बांधण्याची. तर नगर, गोंदिया, येरवडा, मुंबई, हिंगोली, भुसावळ, अलिबाग व नांदेडमध्ये नवी कारागृह बांधण्यात येणार आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

Back to top button