थर्टी फर्स्ट साठी कोकणात 80 टक्के बुकींग | पुढारी

थर्टी फर्स्ट साठी कोकणात 80 टक्के बुकींग

मुंबई ; पुढारी डेस्क : गेली दीड वर्षे घराच्या पिंजर्‍यात कैद असलेला प्रत्येकजण यंदाचा थर्टी फर्स्ट उत्साहात साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागु केलेल्या निर्बंधांमुळे नववर्षाचे स्वागत घरातच बसुन करावे लागले होते.

परंतु, यंदा आकाश मोकळे झाले असून नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील लॉज, हॉटेल्स, होम स्टे, रिसॉर्टमधील बुकींग जवळपास 80 टक्के झाले असून पुढच्या आठवड्यात हेच बुकींग 100 टक्क्यांपर्यंत जाईल अशी माहिती कोकणातील विविध ठिकाणच्या हॉटेल्स, रिसॉर्टच्या मालकांनी दिली आहे. दरम्यान, सध्या ओमायक्रॉनची दहशत आहे. परंतु, ही दहशत पर्यटकांनी झुगारून देऊन सुट्टी घालवण्यासाठी प्लॅनिंग केल्याचेच चित्र आहे.

यंदा पर्यटकांचा उत्साह प्रचंड असून सहकुटुंब कोकणात पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे आलेली नकारात्मकता, नैराश्य झटकण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला असून नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील बीचेसना पसंती दिल्याचे हरिहरेश्‍वरचे सरपंच अमित खोत यांनी सांगितले. हरिहरेश्‍वर बीचवर दिवाळीपासूनच गर्दी दिसू लागल्याचे ते म्हणाले.

25 डिसेंबर ते 7 जानेवारी हाऊसफुल्ल

ख्रिसमस म्हणजेच 25 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत सर्व ठिकाणी बुकींग हाऊसफुल्ल असल्याचे हरिहरेश्‍वरच्या सुधा विहार होम स्टेचे मालक संतोष मयेकर यांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासूनच बुकींगसाठी फोन येत असल्याचे ते म्हणाले. तर अनेक ठिकाणी आतापासूनच बीचेसवर गर्दी दिसू लागल्याचे दिवेआगारच्या सीबॅसील लॉजचे मालक उदय बापट यांनी सांगितले. तर पुढच्या आठवडाभरात बुकींग हाऊसफुल्ल होईल असे रत्नागिरीच्या लाडघर येथील सागररत्न रिसॉर्टच्या मालकांनी सांगितले. यावरुन पर्यटकांचा उत्साह कीती मोठा आहे हे अधोरेखित होत आहे.

महागाई वाढल्याने जेवणाचे दर वाढले

भाज्या महागल्या, मासे, मटणही महागले त्यामुळे जेवणाचे दर वाढल्याचे हरीहरेश्‍वर येथील अलाईव्ह बीच रिसॉर्टचे प्रथमेश कुळकर्णी यांनी सांगितले.

भाज्यांचे दर वाढल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शाकाहारी थाळीचे दर 25 ते 50 रुपयांनी तर मांसाहारी थाळीचे दर 150 ते 200 रुपयांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटकांच्या प्रतिसादासाठी दर कमी केल्याचे दिवेआगारच्या सनी गेस्ट हाऊसचे मालक क्षीरसागर आणि शिवासागर रिसॉर्टचे मालक कुळकर्णी यांनी सांगितले.

Back to top button