सक्षमता प्रमाणपत्र नसलेल्या २० हजार एजंट्सची नोंदणी रद्द | पुढारी

सक्षमता प्रमाणपत्र नसलेल्या २० हजार एजंट्सची नोंदणी रद्द

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्थावर मालमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या २० हजार एजंट्सची नोंदणी महारेराने वर्षभरासाठी रद्द केली आहे. महारेराने ठरवून दिलेले प्रशिक्षण पूर्ण करून आणि त्यानंतर परीक्षा देऊन त्याचे प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदविले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून, प्रमाणपत्र प्राप्त करून, संकेतस्थळावर नोंदवले तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

वर्षाच्या कालावधीत जे प्रतिसादच देणार नाहीत त्यांची नोंदणी वर्षानंतर आपोआप कायमची रद्द होईल. त्यानंतर ६ महिने त्यांना अर्जही करता येणार नाही. ६ महिन्यानंतर नव्याने नोंदणी घेता येईल. या काळात त्यांना स्थावर संपदा क्षेत्रात व्यवहार करता येणार नाही. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महारेराने दिला आहे.

मे २०१७ ला महारेरा स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ४७ हजार एजंटसनी महारेराकडे नोंदणी केली आहे. यापैकी १३,७८५ एजंटसनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द केल्याचे यापूर्वीच महारेराने जाहीर केले आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंट्सच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. या क्षेत्रातील एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. म्हणूनच महारेराने एजंट्सना प्रशिक्षण घेऊन, परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केले आहे.

१० जानेवारी २०२३ ला घेतलेल्या या निर्णयाला अनेकदा मुदतवाढ देऊन अखेर १ जानेवारी पासून तो सर्व एजंट्ससाठी बंधनकारक करण्यात आला. तरीही पात्रता नसलेले २० हजाराच्यावर एजंट्स या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्यात आले, असे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button