Nashik Crime News | मुंबई सायबर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासवून ५० लाखांची फसवणूक | पुढारी

Nashik Crime News | मुंबई सायबर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासवून ५० लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  – आतापर्यंत ऑनलाइन फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले असून, यात भर घालणारा आणखी एक प्रकार उघडकीस आला. मुंबई सायबर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासवून मनी लाँडरिंगच्या गुन्ह्याची भीती दाखवत तीन भामट्यांनी एकाची तब्बल ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.

सायबर पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून, फिर्यादी घरी असताना ८५९२७६९६८३ आणि ८२२२८५६८१७ या क्रमांकाच्या मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तसेच व्हॉट्सॲपवर चॅटिंगही करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने तसेच विजय खन्ना व राहुल गुप्ता या नावांच्या व्यक्तींनी मुंबई सायबर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे फिर्यादीस भासविले. त्यानंतर संशयितांनी फिर्यादीला तुमचा मोबाइल क्रमांक हा मनी लाँडरिंगमध्ये संशयास्पद आढळल्याची बतावणी केली. यातून सुटका करून घ्यायची असल्यास त्यांना बँक खात्यातील जमा असलेली रक्कम ही संशयितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांना दि. २ ते १४ जून २०२४ या कालावधीत इंटरनेट, फोन पेद्वारे तसेच स्काय ॲपच्या माध्यमातून ४९ लाख ८९ हजार रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button