Nashik Crime News | गोणीत सापडले मानवी सांगाडे; पेठ रोडवरील घटनेने खळबळ | पुढारी

Nashik Crime News | गोणीत सापडले मानवी सांगाडे; पेठ रोडवरील घटनेने खळबळ

पंचवटी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  – पेठ रोडवरील एरंडवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मानवी कवट्या असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या, कुठून आणल्या, तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती. तर कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जात असून, भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवटयांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. तर याबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गोणीत मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या मागचा सूत्रधार व त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळच्या सुमारास एरंडवाडीत असलेल्या देवी मंदिराजवळ एका गोणीत मानवी हाडे आणि कवट्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. तर ही चर्चा वाऱ्यासारखी पंचवटी परिसरात पसरल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे सर्व ताब्यात घेत मंदिराच्या पुजाऱ्याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत अधिक माहिती घेतली असता ही मानवी हाडे व कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे समजते. मात्र मंदिराजवळ हे सर्व गोणीत कोणी ठेवले किंवा कोणी आणले याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र परिसरातील नागरिकांकडे या परिसरात कोणी अघोरी विद्या करणारा मांत्रिक किंवा भगत आहे का? याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमका काय प्रकार होता हे कळू शकेल, तर पुढील तपास पंचवटी पोलिस करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button