Nashik News | स्वाईन फ्लू रुग्णांसाठी झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष | पुढारी

Nashik News | स्वाईन फ्लू रुग्णांसाठी झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. स्वाईन फ्लू रुग्णांसाठी जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून आॉक्सिजन बेडसह टॅमीफ्लू औषधसाठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.

स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक ठरला आहे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळून आले होते. एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले. त्यानंतर मे महिन्यात सिन्नर मधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिला तसेच नाशिकमधील जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पाठोपाठ दिंडोरीतील ४२ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने तिचे निधन झाले. आता चांदवड तालुक्यातील तिसगाव भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला आहे. कोरोनाच्या संकटानंतर स्वाईन फ्लूचा वाढलेला मृत्यूदर नाशिककरांना धडकी भरवणारा ठरला आहे

नाशिक शहरात स्वाईन फ्लूचा १ नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील स्वाईन फ्लू बाधितांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २४ आहे. शहरातील २८ तर ग्रामीण भागातील १७ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरातील २ तर ग्रामीण भागातील ७ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. या आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांवर उपचारासाठी सहा बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

सिडकोतील रुग्णाचे कॉन्टक्ट ट्रेसिंग

नाशिक शहरात सिडको भागात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला आहे. रुग्णांच्या कुटुंबिय तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींची महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान, स्वाईन फ्लूची लक्षणे असलेला रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.

स्वाईन फ्लू नियंत्रणात असला तरी दक्षतेचा भाग म्हणून महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र स्थापन करण्यात आला आहे. आॉक्सिजन बेडची सुविधा या कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षणे आढळल्यास रुग्णांनी उपचार घ्यावेत. – डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, मनपा.

हेही वाचा:

Back to top button