राज्यातील मविआच्या जागावाटप उद्या जाहीर होणार : नाना पटोले  | पुढारी

राज्यातील मविआच्या जागावाटप उद्या जाहीर होणार : नाना पटोले 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मविआच्या जागा वाटपाचे सूत्र उद्या मुंबईत जाहीर होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच “मुंबईत आम्हाला तीन जागा लढायच्या होत्या मात्र दोन जागांवरही आम्ही समाधानी आहोत,” असेही नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळणार की एक यासंदर्भात उद्या स्पष्टता मिळणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीला वेग दिला आहे. असे असले तरी राज्यात मात्र भाजपने २० उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. राज्यातील काँग्रेसचे उमेदवार उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचे सूत्र अजून ठरलेले नाही. दरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक झाली. या बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, जागावाटपाचे सूत्र उद्या मुंबईत जाहीर होणार आहे.  तसेच आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतरच काँग्रेसचे उमेदवार ठरतील, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना भेटत आहेत. शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी ही, आमची मागणी होती. त्यांनी काँग्रेसकडून लढणार असल्याचे सांगितले त्यामुळे ते काँग्रेसचे उमेदवार असतील, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तर संजय राऊतांवर बोलताना पटोले म्हणाले की संजय राऊत आणि आमच्यात प्रेम आहे. म्हणून ते आमच्यावर बोलतात. ‘ये पॉलिटीकल प्यार है’ म्हणत नाना पटोलेंना कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

‘चंद्रपूर साठी आमच्याकडे अनेक उमेदवार’

गेले काही दिवस चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. काँग्रेसचे बाळू धानोरकर हे या ठिकाणाहून निवडून आलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. भाजपने याठिकाणी राज्यातील वरिष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमध्ये मात्र उमेदवारीसाठी बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर इच्छुक आहेत. सोबतच युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आणि विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार देखील इच्छुक आहेत. दोन्ही बाजूंनी उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर “चंद्रपूरसाठी आमच्याकडे खूप उमेदवार आहेत,” असे नाना पटोले दिल्लीत बोलताना म्हणाले.

Back to top button