Pankaja Munde News: आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू – पंकजा मुंडे यांचा घणाघात | पुढारी

Pankaja Munde News: आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू - पंकजा मुंडे यांचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क: आता माझी माणसं उन्हामध्ये राहणार नाहीत. तर आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घरच उन्हात बांधू, असा घणाघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. बीड येथील भगवानगडावर आज (दि.२४) दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. (Pankaja Munde News)

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. आता माझी माणसे भगवान शिवाची रूपं आहेत शिवशंकर भोळा आहे, पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे. सकाळी मोहन भागवत यांनी सांगितलं की, नितिमत्ता ठेवून राजकारण करा. नितिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणे हे देशाच्या हिताचे नाही त्यामुळे वाघ आणि सिंह मिळून एक प्राणी बनतो त्याला म्हणतात ‘लायगर’. पण बकरी आणि सिंहाचा पछाडा तयार करता येत नाही, कारण निसर्गाचे काही नियम आहेत. तुम्ही जिंकण्यासाठी काहीही करू शकता, पण जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाहीत, नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही असा घणाघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून बोलताना केला. (Pankaja Munde News)

Pankaja Munde News: गेल्या पाच वर्षांत पक्षासाठी खूप काम केलं- पंकजा मुंडे

मी बँकेची कर्जदार नाही, तर लोकांची कर्जदार आहे. माझ्यावरती मालकी लोकांची आहे. माझी निष्ठा माझे नेते, मत माझे कष्ट माझं, सर्वस्व हे तुमचं आहे. ज्या ठिकाणी तुमचं (जनतेचं) आहे. त्याच ठिकाणी पंकजा मुंडे नतमस्तक होईल. गेल्या पाच वर्षांमध्ये मी पक्षासाठी खूप काम केलं. मध्य प्रदेश असेल, परळी असेल, सर्व मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या भगवान बाबांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवान बाबांना सुद्धा गड सोडावा लागला. कृष्णाला सुद्धा मथुरा सोडावी लागली. बाप कर्जबाजारी झाला, अडचणीत आला तर गळफास घेऊन आत्महत्या करतो. पण आईला मात्र तसे करता येत नाही तर, तिचा छळ झाला तरी सहन करावा लागतो. अशी उदाहरणं देत पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. (Pankaja Munde News)

मी कोणाच्याही मेहनतीचं खाणार नाही

इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा, प्रीतम ताई गरीब आहेत. असे अनेकांकडून मला सल्ले दिले जातात. पण असं काही चालणार नाही. मी कोणाच्याही मेहनतीचं खाणार नाही. एक वेळ मी तुमच्यासाठी मेहनत करीन, तुम्ही म्हणले तर ऊस तोडायला जाईन, पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. ऊसतोड महामंडळाला नाव देऊन लोकांचे प्रेम मिळवता येणार नाही. जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी पुढच्या दसऱ्याला तोंड दाखवणार नाही असे देखील त्या दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाल्या.

मुंडे यांचे स्मारक दहा वर्ष झाले तरी होऊ शकले नाही

माझा अपमान तुमचा अपमान आहे. माझे दुःख तुमचे दुःख आहे. जो आक्रोश तुमच्या मनात आहे. तो माझ्या मनात देखील आहे. हे सर्व लक्षात घेऊन तुम्हाला हवे असलेले राजकारण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. आता मी माझ्या मालकीची नाही तर मी तुमची सेवक आहे. मी गोपीनाथ गड तीन महिन्यात बनवला. सरकारकडून मुंडे यांचे स्मारक दहा वर्ष झाले तरी होऊ शकले नाही. आता स्मारक बनवू नका. सरकारला बीडच्या जनतेसाठी काही करायचेच असेल तर माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या पासून रोखण्यासाठी काहीतरी करा, असे आवाहन देखील याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी केले.

माझ्या आयुष्यात फक्त नीतिमत्ता महत्त्वाची

कोणत्या गावात माझा कार्यकर्ता आहे, हे मी पाहिलं नाही. कोणत्या गावात कोणता समाज आहे हे मी पाहिलं नाही. खासदार प्रीतम मुंडे ज्यावेळी लोकसभेला उभ्या होत्या. त्यावेळी मी गावात प्रचाराला जायचे, तेव्हा मी लोकांना उभा करून वंजारी समाज किती आहे?, धनगर समाजाचे किती आहेत?, असे विचारायचे पण त्यावेळी तिथे दिलेला निधी जाहीर करायची. कोणाची जात पाहून मी कधी निधीचा आकडा ठरवला नाही. माझ्या आयुष्यात फक्त नीतिमत्ता महत्त्वाची आहे, माझ्या आयुष्यात दुसरं काही नाही.

आपल्याला युद्धाला तयार राहावं लागेल

गोपीनाथ मुंडे यांची लेख म्हणून असलेली हिम्मत आणि माझ्यावर लोकांवर असलेला विश्वास हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणी म्हणतं ताई या पक्षात चालल्या, कोणी म्हणतं त्या पक्षात चालल्यात, कोणी म्हणतं आम्हाला असं कळलं, तर कोणी म्हणतं तसं कळलं. पण पद नसताना निष्ठा काय असते हे या लोकांना विचारा. अनेक देवांनासुद्धा युद्धामध्ये पराभूत व्हावं लागलं. तर युद्धाला आपल्याला सुद्धा तयार राहावं लागेल. असे देखील पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

Back to top button