रमाकांत बिरादार यांची मुंबई पोलिसांकडून सात तास चाैकशी | पुढारी

रमाकांत बिरादार यांची मुंबई पोलिसांकडून सात तास चाैकशी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोविड काळातील शव पिशवी (बॉडी बॅग) खरेदी घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगर पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाचे तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांची शनिवारी सात तास कसून चाैकशी केली. आर्थिक गुन्हे शाखेन बिरादार यांना समन्स बजावून चाैकशीला हजर रहाण्यास सांगितले होते.

कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून कोविड केंद्र उभारणी, वैद्यकीय उपकरणे, साहित्य, अाैषध खरेदी, डाॅक्टर पुरवठा अशा विविध कंत्राटांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत केली होती. यात बॉडी बॅग खरेदी ही वाढीव किंमतीने करण्यात आल्याचा आरोप आहे. यातील बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने प्राथमिक तपास करत ४ ऑगस्टला मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या संबंधितांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात ४९.६३ लाख रुपयांच्या फसवणूकीचा कलम ४२० आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पालिकेचे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण विभागाचे कार्यालय मुंबई महापालिकेत लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवते. या खात्याची सुत्रे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे तर, जबाबदारी उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे होती. कोविड काळात याच कार्यालयाकडून विविध वैद्यकीय उपकरणे, साहित्य, आैषधे, ऑक्सिजन, बाॅडी बॅग आणि इतर साहित्य खरेदी करण्यात आले होते. कोरोना काळात मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग दिड ते दोन हजार रुपयांत उपलब्ध असताना त्याची ६ हजार ७१९ रुपयांना खरेदी केल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात समोर आले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२२ या काळात मुंबईच्या महापाैर होत्या. त्यांच्याच सूचनेनुसार हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे. याच आरोपांची चाैकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हेशाखेने बिरादार यांना समन्स बजावले. त्यानुसार, बिरादार हे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हेशाखेच्या कार्यालयात पोहचले. येथे त्यांची सायंकाळी सहापर्यंत चाैकशी करुन जबाब नोंद करण्यात आला. दरम्यान, कोविड काळातील पालिकेशी संबंधित विविध प्रकारच्या कंत्राटांच्या अनियमिततेबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बिरादार यांच्याकडे चाैकशी करुन त्यांचा जबाब नोंदविला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button