शिवसेना-भाजपसोबत रिपाइंदेखील : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

शिवसेना-भाजपसोबत रिपाइंदेखील : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना-भाजप युती एकत्रितच लढविणार असून, राज्यात रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षदेखील देखील आमच्या सोबतच असेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रविवारी अत्यंत तातडीचा व धावता दिल्ली दौरा करून मुख्यमंत्री परतले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती भक्कम आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा, विभानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्रपणे लढविणार आहे. त्यासंदर्भात दोन्ही पक्षांतील जिल्हा-तालुका पातळीवर समन्वय घडविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बहुमताने जिंकणार

युतीचे सरकार गेले 11 महिने अतिशय एकजुटीने काम करत आहे. विकासाचे विविध निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली आहे. रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमाकांचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणुका लढविणार आहोत आणि बहुमताने जिंकणार, असे ट्विट देखील मुख्यमंत्र्यांनी केले.

अडीच वर्षे स्पीडब्रेकर होते

सरकारमध्ये किंवा युतीत कोणतेही मतभेद नाहीत. तसे आरोप करणार्‍या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आधी अडीच वर्षे स्पीडब्रेकर होते, असा उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावतानाच आता मुंबईसह राज्यभरात अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Back to top button