Monsoon Forecast | यंदा मान्सूनचे आगमन लवकर, IMD ने सांगितली तारीख
पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून (Southwest monsoon) दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि निकोबार बेटांवर १९ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यपणे मान्सून १९ मे च्या दरम्यान या भागात मान्सून दाखल होतो. पण यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी व्यक्त केला आहे.
काय आहे मान्सूनचा अंदाज?
- यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता
- मान्सूनवर परिणाम करणारा 'एल निनो'कमकुवत होणार
- मान्सून हंगामात 'ला निना' परत येण्याचा अंदाज
- यामुळे यंदा मान्सून धो-धो बरसणार
मान्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो; त्यानंतर त्याचा उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरु होतो. १५ जुलै पर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. यंदा देशात मान्सून दमदार बरसणार असल्याचा अंदाज आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने याआधीच वर्तवली आहे.
"नैऋत्य मान्सून १९ मे २०२४ च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर येण्याची दाट शक्यता आहे," असे हवामान विभागाने सांगितले. याच कालावधीत पुढील सात दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगालचा भाग, सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहू शकते. तसेच याच कालावधीत तामिळनाडू, पाँडेचेरी, केरळ आणि कर्नाटकमध्ये सगळीकडे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. यंदा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (Long Period Average -LPA) तुलनेत १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता (यात ५ टक्के कमी अथवा अधिक तफावत असू शकते) असल्याचे हवामान विभागाने याआधी जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशात एल निनोची परिस्थिती मध्यम आहे. नवीन मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (MMCFS) तसेच इतर हवामान मॉडेलचे अंदाज असे सूचित करतात की एल निनो स्थिती पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात तटस्थ एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) स्थितीत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. तर पावसाळ्याच्या उत्तरार्धात ला निना परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
स्कायमेटचा अंदाज काय सांगतो?
यंदा देशात मान्सूनची स्थिती सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने याआधी वर्तवला होता. मान्सून हंगाम १०२ टक्के (५ टक्के अधिक-वजा मार्जिन) असेल, असे म्हटले होते. सरासरीएवढा पाऊस पडणे म्हणजे पर्जन्यस्थिती चांगली असणे, असेच मानले जाते. हवामान विभागाकडूनही ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यानच्या पावसाला सरासरीएवढा अथवा समाधानकारक मानले जाते. असा पाऊस पिकांसाठी तसेच पाण्याच्या इतर गरजांसाठी उत्तम मानला जातो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामातील सरासरी ८६८.६ मिमी राहील. महाराष्ट्रासह २३ राज्यांत चांगला पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले होते.
यंदा धो-धो बरसणार
गेल्या वर्षी पॅसिफिक महासागरात 'एल निनो'ची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे त्याचा मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम दिसून झाला. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. तसेच हिंवाळ्यातही उबदार वातावरण राहिले. पण आता जगभरातील अनेक हवामान संस्थांनी येत्या मान्सून हंगामात 'ला निना' परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे धुवांधार पाऊस पडू शकतो.
हे ही वाचा :

