दुपारनंतर मतदारराजाची केंद्रांवर गर्दी; सायंकाळी केंद्रांबाहेर रांगा

दुपारनंतर मतदारराजाची केंद्रांवर गर्दी; सायंकाळी केंद्रांबाहेर रांगा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॅन्टोन्मेंट विधानसभा परिसरातील मतदारांनी यंदा दुपारनंतरच मतदान करण्याला पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या सुमारास येथील मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक गर्दी होती. दुपारी 12 नंतर ही गर्दी वाढली. ती सायंकाळी उशिरापर्यंत दिसली. पुणे लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान सोमवारी (दि. 13) मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी मतदानासाठी नागरिक आपल्या कुटुंबीयांसह घराबाहेर पडल्याचे चित्र दिसले.

स्वत:च्या खासगी वाहनाने कुटुंबीयांसोबत अनेक जण मतदानासाठी दिसले. यात विशेष म्हणजे काही जण कधी नव्हे ते आपल्या वयस्कर आई-वडील, आजी-आजोबा यांना मतदानासाठी घेऊन येताना पाहायला मिळाले. सकाळी अकरापर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कॅन्टोन्मेंटमधील टक्केवारी सर्वाधिक कमी होती. मात्र, दुपारनंतर यात वाढ झाली. दुपारी एक ते चारच्या दरम्यान मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. परिणामी, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी अचानक वाढली. पाच वाजता कॅन्टोन्मेंटची मतदानाची टक्केवारी 44.1 झाली होती.

कॅन्टोन्मेंट परिसरातील सेंट मीराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. असेच चित्र सोमवारी आरटीओ आणि रेल्वे मुख्यालयाशेजारील एसएसपीएमएस कॉलेजमधील मतदान केंद्रावर दिसले. दुपारी दोननंतर येथील प्रत्येक खोलीबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

अशी वाढत गेली टक्केवारी

सकाळच्या सुमारास सहाही विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानांच्या टक्केवारीत कॅन्टोमेंटमधील टक्केवारी सर्वाधिक कमी होती. दुपारी 1 वाजेपर्यंत 23.21 टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी एक ते चार दरम्यान मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने कॅन्टोमेंटमधील मतांची टक्केवारी अचानक वाढली. पाच वाजता कॅन्टोमेंटच्या मतदानाची टक्केवारी 44.1 इतकी झाली होती.

सकाळी तुरळक मतदारांची हजेरी मतदारांची नावे गायब

कोरेगाव पार्क, घोरपडी, वाडिया कॉलेज, अंजुमन हायस्कूल, मंगळवार पेठ, भवानी पेठ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचा बहुतांश भाग, या भागांतील मतदारांना त्यांची नावे मतदारयादीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनात काम करीत असलेल्या अधिकार्‍यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषत: कोरेगाव पार्क भागात असलेल्या कस्तुरबा शाळा, संत गाडगेबाबा शाळेतील मतदान केंद्रांवर अनेक मतदारांची नावे गायब झाल्याचे दिसून आले. काही नागरिक तर तीन ते चार केंद्र फिरून आल्यानंतरही त्यांना नाव सापडले नाही. त्यामुळे मतदान न करताच त्यांना घरी परतावे लागले.

यंदा वाढत्या उष्णतेमुळे घराबाहेर निघावे असे वाटत नव्हते. मात्र, मतदान करणे, हे भारतीयांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यासाठी मी वयाच्या 65व्या वर्षीदेखील घराबाहेर पडत आहे. सर्वांनीदेखील घराबाहेर पडून लोकशाहीचा खांब टिकवून ठेवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

– लक्ष्मण ढवळे, मतदार

मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाचा टक्का कमी होता कामा नये. सर्वांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा मतदानासाठीच वापर करावा, अनेक जण या सुटीच्या दिवशी फिरण्याकडे कल देतात, हे चुकीचे आहे. राष्ट्राचा आणि स्वत:चा विकास करायचा असेल, तर मतदान केलेच पाहिजे.

– प्रकाश आयर, मतदार

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news