Loksabha Election | आम्हीच जिंकणारचा.. महायुती-महाविकास आघाडीचा दावा!

Loksabha Election | आम्हीच जिंकणारचा.. महायुती-महाविकास आघाडीचा दावा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेला दीड महिना सुरू असलेल्या लोकसभेच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. या मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदारांच्या प्रतिसादानंतर निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीने आम्हीच जिंकणार असल्याचा दावा दैनिक 'पुढारी'शी बोलताना केला आहे.

पुणेकर विजयी करतील : मोहोळ

पुणे लोकसभेचा इतिहास पाहता प्रचारासाठी एवढा मोठा कालावधी कोणालाही मिळाला नाही, तो या निवडणुकीत मिळाला. पहिल्या टप्प्यात समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती व पक्षाच्या ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन प्रचारास सुरुवात केली. दोन महिन्यांच्या प्रचारादरम्यान समाजातील विविध स्तरांतील मतदारांचा प्रतिसाद लाभला. पुणे शहरात केंद्राच्या माध्यमातून झालेली विकासकामे, भविष्यातील प्रकल्प, लाभार्थ्यांची अडीच लाखांहून अधिक असलेली संख्या, या बाबी निवडणुकीच्या टप्प्यात महत्त्वाच्या ठरल्या. भाजपसह महायुतीतील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून मतदान होईपर्यंत एकदिलाने काम केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे बोललो होतो, ते खरे करून दाखविले.

प्रचारादरम्यान विरोधकांकडून वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीवर टीका केली. मात्र, पुणेकरांवर माझा विश्वास असल्याने मी स्वतःचा संयम ढळू दिला नाही. विरोधकांवर वैयक्तिक टीका न करता प्रचाराची पातळी राखली. ही निवडणुक राष्ट्राचे कणखर नेतृत्व निवडण्याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्याची पुणेकरांची इच्छा प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्ट दिसत होती. पुणेकर मोदींसाठी आपले एक बहुमूल्य मत देऊन या निवडणुकीत आपणास विजयी करतील, असा दावा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला.

जनतेच्या पाठिंब्यामुळे यश निश्चित : जोशीmura

लोकसभेची ही निवडणूक ऐतिहासिक आहे. मतदारांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला, तेव्हापासून पुणेकरांनी धंगेकरांना आपला उमेदवार मानले आहे. यामुळे महाविकास आघाडीला पहिल्यापासून प्रचारात आघाडी मिळाली. भाजपला महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागत होते. आमचे नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत त्यांच्या 47 मिनिटांच्या भाषणाला प्रतिसाद दिली. सर्व विधानसभा मतदारसंघांतील पदयात्रा, सभा, कॉर्नर सभांना पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविकास आघाडी व इंडिया फ—ंटचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले.

सर्व लोकप्रतिनिधी भाजपचे निवडून देऊनही भाजपने पुणेकरांचा भ्रमनिराश केला. दहा वर्षांत केलेले एक काम भाजप नेत्यांना सांगता येत नाही. पक्ष फोडले, हे जनतेला आवडलेले नाही. भाजपच्या 'बी टीम' असलेल्या वंचित आणि एमआयएमचा या निवडणुकीत कोणताही परिणाम पुणेकरांवर व निवडणुकीवर झाला नाही. मागील निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना होती. ती शिवसेना आज आमच्यासोबत आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता महागाई, बेरोजगारी व खोटी आश्वासने, यामुळे कमी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा बहुमताने विजय निश्चित आहे, असा दावा महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news