पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रचंड वादळी पाऊस आणि धुळीचे वादळ अकस्मात धडकल्याने सोमवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे परिसराची धुळधाण उडाली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग कोसळले (Mumbai Hoarding Collapse). या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जणांवर उपचार सुरू आहेत.
घाटकोपरमध्ये (Mumbai Hoarding Collapse) घटनास्थळी एनडीआरएफच्या दोन पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचे निखिल मुधोळकर यांनी सांगितले की, "आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८८ लोकांना वाचवण्यात आले आहे. ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
घाटकोपर येथे कोसळलेले महाकाय होर्डिंग (Mumbai Hoarding Collapse) अनधिकृत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या होर्डिंगला लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाची परवानगी होती. परंतु पालिकेचे नियम धाब्यावर बसवून १४ हजार ४०० चौरस फुट आकाराचे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले. दरम्यान, या होर्डिंगचा मालक भावेश भिडे व अन्य आरोपींवर पंतनगर पोलिसात महापालिकेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रात्री उशीरा सांगण्यात आले. या दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष जाऊन दुर्घटनेची माहिती घेतली.
घाटकोपर येथे पालिकेचे नियम धाब्यावर बसवून रेल्वे वसाहत येथे महाकाय होर्डिंग उभारण्यात आले होते. ७ डिसेंबर २०२१ मध्ये होर्डिंग उभारण्यास रेल्वे लोहमार्ग आयुक्तांनी परवानगी दिली. पालिकेच्या होर्डिंग धोरणामध्ये ४० बाय ४० म्हणजे १ हजार ६०० चौरस फूट पर्यंत होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. परंतु युको मीडिया कंपनीने १२० बाय १२० म्हणजेच १४,४०० चौरस फूट होर्डिंग उभारले. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विष प्रयोग करण्यात आला होता. तर काही झाडे तोडण्यात आली. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. एवढंच नाही तर धोरणानुसार वोटिंगचं आकारमानही मोठे असल्यामुळे नोटीस बजावून हे काम थांबवण्यात आले होते. मात्र तरीही कंपनीने एप्रिल २०२२ पासून होल्डिंग उभारण्याचे काम सुरू केले.
हेही वाचा :