Biogas Project : आशियातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प मुंबईत | पुढारी

Biogas Project : आशियातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प मुंबईत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेकडून शहराच्या हद्दीत आशियातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यात ओल्या कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करुन कॉम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) तयार केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून प्रस्ताव आल्यानंतर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

महानगर लिमिटेडच्या (एजीएल) सहकार्यातून पालिका हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज १ हजार टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. सध्या तो आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. त्यात ३०० टन धानाच्या कचऱ्यापासून ३३ टन गॅस दररोज तयार केला जातो.

सध्या मुंबईत ६ हजार टन घन कचरा गोळा होतो. त्यापैकी ३ हजार ५०० टन ओला कचरा आहे. याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की दररोज ६ हजार टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता असेल. दररोज मुंबईत गोळा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी एक तृतियांश कचऱ्यावर या प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल प्रक्रियेची क्षमता लक्षात घेतली तर हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचा सदुपयोग करण्याच्या कल्पनेतून हा प्रकल्प उभा राहणार आहे.

पूर्व उपनगरातील ३ जागा प्रस्तावित

येत्या काही आठवड्यांमध्ये महापालिका आणि एजीएल यांच्यात यासंदर्भात करार होणार आहे. त्या अंतर्गत महापालिका जागा देणार असून खर्चाचा भाग एसजीएल बघणार आहे. पूर्वेकडील उपनगरांमधील तीन जागा या प्रकल्पासाठी सध्या निर्धारित करण्यात आल्या आहेत. करार करण्यापूर्वी नियोजित जागेबाबत निर्णय घेतला जाईल. करार झाल्यानंतर केवळ एका वर्षात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

असे होईल व्यवस्थापन

महापालिका शहरातून गोळा झालेल्या ओल्या कचऱ्याचे वर्गिकरण करुन या प्रकल्पाला पुरविणार आहे. त्यानंतर एमजीएची भूमिका सुरु होणार आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यातून तयार झालेला गॅस शहराला पुरविला जाणार आहे. सध्या पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये पाच वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. त्यानंतर तो कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये पोहोचवला जातो. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर पालिकेची ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढणार आहे.

Back to top button