भाजपचे मिशन महापालिका | पुढारी

भाजपचे मिशन महापालिका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणबाबतच्या याचिकेवरील निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता विचारात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्यांना राज्यातील महापालिका निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश दिले. महाविकास आघाडीच्या विशेषतः शिवसेनेच्या प्रभावाखालील महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश देत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या शहा यांनी शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. कोणकोणत्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या, त्याचा शहरी भागातील मतदारांना कितपत लाभ झाला, हेसुद्धा जाणून घेतले.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका आर्थिक आणि राजकीय शक्तिस्थळे आहेत. या महापालिकांच्या जोरावर ठाकरे गटाची भिस्त आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून येथेही ताकद लावा, असे निर्देश शहा यांनी दिल्याचे समजते.

कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी – चिंचवड या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ताकदवान आहे. तेथेही लक्ष देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील इतर महापालिका कशा जिंकता येतील, याचा प्रामुख्याने विचार करा, असेही त्यांनी बजावले.

महापालिका निवडणुकांनंतर राज्यात विविध पंचायत समित्या आणि नगर परिषदांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या भावना दुखावून चालणार नाही. जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलेल्या नेत्यांना निवडणुकीपुरते दूर ठेवा, असे कडक निर्देश शहा यांनी दिले. या निवडणुकांमध्ये जिंकणे अतिशय महत्त्वाचे असून यावरच पुढच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे शहा यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे समजते.

Back to top button