उद्धव ठाकरेंची फडणवीसांवरील टीका नैराश्येपोटी : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

उद्धव ठाकरेंची फडणवीसांवरील टीका नैराश्येपोटी : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात देवेंद फडणवीस यांच्यावर केलेली टिका ही सत्ता गेल्याने नैराश्यपोटी आणि जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी केली आहे. त्यांना आम्ही योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

ठाण्यात रोशनी शिंदे या युवा सेनेच्या कार्यकर्तीला शिंदे गटाकडून झालेल्या मारहाणीमुळे राजकिय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्तीची कुटुंबासह भेट घेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच फडणवीस यांना टार्गेट केले होते. बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत एकनाथ शिंदे यांच्या घरातच त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देतान शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, मला गुंडमंत्री आणि फडणवीस यांना फडतूस म्हणता. तुमच्या अडिच वर्षाच्या काळात काय काय कांड झाले ते तुम्हाला माहीत नाही का, तुमचे दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेले. जे विरोधात बोलले त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले. नारायण राणे यांना जेवणावरून उठवले, कंगना राणावतचे घर तोडले. केतकी चितळे, राणा दाम्पत्याला तुम्ही तुरुंगात टाकले, त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री पदावर होतात. ही तुमची गुंडागर्दी नव्हती का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

आमच्याकडे बोलण्यासारखे बरेच काही आहे, पण आम्ही आमची मर्यादा सोडलेली नाही. आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांनी घरावर तुळशीपत्र ठेवली आहेत.आम्ही तुमच्यासारखे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार्‍यांवर मी काय बोलणार, असा प्रतिसवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Back to top button