किरीट सोमय्याच ईडीच्या कारवाईमागचे खरे सूत्रधार; हसन मुश्रीफ यांचा सत्र न्यायालयात दावा | पुढारी

किरीट सोमय्याच ईडीच्या कारवाईमागचे खरे सूत्रधार; हसन मुश्रीफ यांचा सत्र न्यायालयात दावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध गेल्या १० वर्षांत एकाही शेतकऱ्याने फसवणुकीची तक्रार केलेली नाही. राजकीय सूडबुद्धीने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विवेक कुलकर्णी यांच्यामार्फत तक्रार केली आहे. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. किरीट सोमय्याच ईडीच्या कारवाईमागचे खरे सूत्रधार आहेत, असा दावा मुश्रीफ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. आबाद पोंडा यांनी सोमवारी सत्र न्यायालयात केला.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित सुमारे ३५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांना कारवाईपासून अंतरिम दिलासा देताना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यास मुभा दिली होती. त्यानुसार मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी मुश्रीफ यांच्यातर्फे अॅड. पोंडा यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या कोणत्याही पदावर नसतानाही मुश्रीफ यांचा कथित गैरव्यवहाराशी ईडी संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Back to top button