सावरकरांवरून ठाकरेंची कोंडी | पुढारी

सावरकरांवरून ठाकरेंची कोंडी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सावरकरांबाबत थेट राहुल गांधी यांना इशारा दिल्यानंतर भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सावरकरांवरून नुसती नौटंकी नको, हिंमत असेल तर काँग्रेसला सोडा, असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना दिले आहे. सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारण्याचे आदेश बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते, तसे राहुल गांधी यांच्याबाबतीत करणार का, असा बोचरा सवाल भाजपने केला आहे.

रविवारी मालेगाव येथे एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, आपण एकाच लढाईचे सोबती असताना नसते फाटे फोडू नका, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आणि आदर्श आहेत. आपल्याला एकत्र राहायचे असल्यास सावरकरांबद्दल उल्लेख टाळा. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले असून, भाजपने यावरून ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या साथीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे यांना घेरण्यास प्रारंभ केला आहे. या साच्यात काँग्रेसने बचावात्मक भूमिका घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी ठाकरे यांची अधिक कोंडी करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने राज्यात सावरकर विचार यात्रा काढण्याचे सोमवारी जाहीर केल्याने आगामी काळात सावरकर या विषयावरून राज्यात घमासान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Back to top button